
कफ परेड परिसरात एका मुलीवर बलात्कार करणाऱया तिघा अटक आरोपींना न्यायालयाने दणका दिला. दोघा नराधमांना न्यायालयाने सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्हय़ातील चौथा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी कफ परेड परिसरात एका बालिकेवर चार जणांनी बलात्कार केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या पालकांनी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी बलात्कार, पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून तिघा आरोपींना अटक केली. त्यानंतर आरोपीविरोधात कफ परेड पोलिसांनी सबळ पुरावे सादर केले. त्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने जितेंद्र सिंह वालचल याला सात वर्षे कारावास आणि 50 हजार रुपये दंड तर दुसरा आरोपी पवन ऊर्फ ओमपाल सिंग याला दहा वर्षे सश्रम कारवास आणि 75 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. मात्र तिसरा आरोपी राकेश सिंग याला सबळ पुराव्याअभावी सोडून देण्यात आले. दरम्यान, चौथा आरोपी पृथ्वी चव्हाण हा अद्याप फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. उपनिरीक्षक शिंदे व पथकाने केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे दोघा आरोपींना शिक्षा लागली.






























































