
सामना प्रतिनिधी। मुंबई
दादरच्या सिद्धपुरा परिसरातील इमारतींच्या पुनर्विकास करणाऱया रिचा डेव्हलपर्सने येथील रहिवाशांना 15 ऑगस्टपासून थकीत भाडे देईन, अशी हमी बुधवारी उच्च न्यायालयात दिली. तसेच शिवाजी पार्क येथील मेट्रो स्थानकाच्या कामामुळे इमारतींचा पुनर्विकास रखडल्याचा दावा केला. त्यावर न्यायालयाने मेट्रो प्रशासन आणि विकासकाला एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आदेश दिले.
रिचा डेव्हलपर्सने पुनर्विकासाच्या नावाखाली सिद्धपुरा परिसरात राहणाऱया 172 कुटुंबीयांची जागा घेऊन त्याबदल्यात रहिवाशांना भाडे देण्यासंदर्भात 2012 साली करार केला. येथील आठ इमारती विकासकाने ताब्यातही घेतल्या, परंतु अद्याप त्या ठिकाणी पुनर्विकासाच्या इमारतीची एक वीटही रचलेली नाही. एवढेच नव्हे तर गेल्या तीन वर्षांपासून विकासकाने भाडेकरूंना भाडय़ाची रक्कम देण्याचेही बंद केले आहे. याप्रकरणी अभिनव दादर टेनंट असोसिएशन तसेच सलील रानडे, विनय आठवले व इतर रहिवाशांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी रिचा डेव्हलपर्सने 15 ऑगस्टपासून रहिवाशांना थकीत भाडे देण्याचे मान्य केले. तसेच मेट्रोच्या कामामुळे हे पुनर्विकासाचे काम करता येत नसल्याची माहिती दिली. त्यावर न्यायमूर्तींनी मेट्रो प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली. मेट्रो प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावले व विकासक काम करण्यास असमर्थ असल्याचे खंडपीठाला सांगितले. हायकोर्टाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत एमएमआरसीएल व विकासकाला एकत्रित बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आदेश दिले व सुनावणी 22 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.


























































