मुंबई ते सोलापूर वेगवान वंदे भारतने केवळ एका तासाची बचत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vande-bharat-express

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद सेमी हायस्पीड वंदे भारत एक्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असून आता मुंबई ते सोलापूर अशी वंदे भारत चालविण्याची घोषणा राज्य सरकारने नुकतीच केली आहे. परंतु मुंबई ते सोलापूर या आठ तासांच्या अंतरात वेगवान ट्रेनमुळे फारसा फरक न पडता केवळ एकाच तासाची बचत होणार आहे. त्यामुळे मुंबई ते ते सोलापूरसाठी निघालेली वंदे भारत व्हाया पुण्याला थांबा घेत ब्रेक जर्नी घडविणार आहे. तसेच मुंबई ते शिर्डी वंदे भारत चालविण्याचीही योजना आहे.

मुंबई ते सोलापूर वंदे भारत चालविण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. वंदे भारत ही सेमी हायस्पीड ट्रेन असल्याने मुंबई ते सोलापूर हे आठ तासांचे अंतर केवळ एका तासाने कमी करता येणार आहे. कल्याणपर्यंत रुळांची क्षमता फारशी चांगली नसल्याने तसेच वेगावर अनेक ठिकाणी निर्बंध असल्याने ही वंदे भारत ट्रेन 110 किमीच्या पुढे वेग गाठू शकणार नसल्याचे अधिकाऱयांचे म्हणणे आहे. मुंबई ते सोलापूर निघालेली ही ट्रेन पुण्याला काही मिनिटांचा थांबा घेणार आहे. त्यानंतर ती सोलापूरला रवाना करण्यात येणार आहे.

तिरुपती बालाजी दर्शनाकरिताही स्पेशल ट्रेन
मुंबई ते शिर्डी साईबाबांच्या भक्तांसाठीदेखील वंदे भारत चालविण्याची योजना आहे. पुणे ते अहमदाबाद वसईमार्गे पश्चिम रेल्वेच्या सहकार्यानेदेखील वंदे भारत चालविण्याची योजना असल्याचे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱयाने स्पष्ट केले. मध्य रेल्वेला एकच वंदे भारत सुरुवातीला मिळणार असून मुंबई ते सोलापूर, शिर्डी तसेच पुणे ते अहमदाबाद अशा तीन मार्गांचा विचार सुरू असल्याचे या अधिकाऱयाने स्पष्ट केले. मध्य रेल्वेने लातूरमार्गे तिरुपती बालाजी दर्शनाकरिताही स्पेशल ट्रेन चालविण्याची योजना आखली आहे.