
सामना ऑनलाईन । मुंबई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला तरुण लोकसभेत जाऊ शकला, अशा शब्दांत दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी बाबासाहेबांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. शीव-कोळीवाडा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेला विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार तमीळ सेलवन, नगरसेवक राहुल कांबळे, निहाल शहा, राजश्री शिरवाडकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, भाजपचे राजेश शिरवाडकर आदी उपस्थित होते.
राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी शीव-कोळीवाडा येथे जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत राहुल शेवाळे यांनी या परिसरात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. पुनर्विकासाची सोडविलेली समस्या, एमयूटीपी-3 ए च्या माध्यमातून सुखद झालेला रेल्वे प्रवास आणि येथे उभारले जाणारे कमर्शियल हब अशा अनेक विकासकामांची माहिती शेवाळे यांनी जनतेला दिली. शिवसेनेचे हिंदुत्व हे व्यापक हिंदुत्व आहे. देशाच्या आणि आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पुन्हा एकदा हवे आहे, असेही शेवाळे म्हणाले.


























































