भूमिगत टाक्यांमुळे सबवे पूरमुक्त, अतिवृष्टीत होणारी वाहतूक कोंडी टळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत अतिवृष्टीत गैरसोयीचे ठरणारे सब-वे पूरमुक्त करण्यासाठी आता भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. यामध्ये सब-वेमध्ये तयार करण्यात येणाऱया टाक्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साठवण्यात येणार असून हे पाणी पंपांच्या सहाय्याने नदी-नाल्यांमध्ये सोडण्यात येणार आहे. ‘हिंदमाता’ या ठिकाणी पहिल्यांदाच राबवण्यात येणाऱया ‘भूमिगत टाक्यां’च्या उपक्रमाप्रमाणेच हे काम करण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

मुंबईत दहिसर सब-वेपासून अनेक भुयारी मार्ग हे रेल्वे लाइन-द्रुतगती मार्गांच्या खाली आहेत. या सब-वेची उंची वाढवणे शक्य नाही पिंवा खोली वाढवणेही शक्य नाही. मात्र थोडय़ाशा पावसाने या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याचे प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण पावसाळ्यात पंप बसवून पाणी उपसण्याचे काम पालिकेला करावे लागते. मात्र पंपांची क्षमता मर्यादित असल्याने मिलन सब-वे, अंधेरी सब-वेसारख्या ठिकाणी एक-दोन मीटरपर्यंत पाणी साचण्याचे प्रकार घडतात.

असे होतेय काम

मुंबईत पश्चिम उपनगरात दहिसर सब-वे, अंधेरी सब-वे, पोयसर सब-वे, मालाड सब-वे, मीलन सब-वे असे महत्त्वाचे सब-वे आहेत. तसेच पूर्व उपनगतही काही सब-वे आहेत. यातील दहिसर – मीलन सब-वेसारख्या ठिकाणी भूमिगत टाक्या भुयारी मार्गाच्या पातळीच्या खाली बांधण्यात येत आहे.

पावसाचे पाणी या भूमिगत टाक्यांमध्ये साठवण्यात येईल. त्यामुळे भुयारी मार्गात पाणी साचणार नसल्याने कितीही पाऊस झाला तरी वाहतूक अखंड सुरू राहील. या ठिकाणी उच्च क्षमतेच्या पंपांच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करून मोठय़ा नाल्यास सोडण्यात येईल.

पावसाळा आणि अतिवृष्टीत आधीच शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले जात असताना सब-वे बंद पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांसह नागरिक-प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे सब-वे पूरमुक्त करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे.