बँकेकडून घेतलेले कर्ज फेडू न शकल्याने वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना दहिसर परिसरात घडली. अमोल वैती असे त्याचे नाव आहे. त्याने आत्महत्येपूर्वी नातेवाईकांना मेसेज केले होते.
अमोल हा दहिसरच्या कांदरपाडा परिसरात कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याने पाच वित्त पुरवठा करणाऱया संस्थांकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाची अमोल परतफेड करू शकला नव्हता. कर्ज वसुलीसाठी बँकेचे एजंट हे अमोलच्या घरी जायचे. त्याला शिवीगाळ करायचे असा नातेवाईकांचा आरोप आहे. तर एचडीएफसी बँकेचा एजंट निखिल विश्वकर्मा हा अमोलला दमदाटी करून त्याला अपमानित करत होता. या त्रासाला अमोल कंटाळला होता.
आज सकाळी अमोल उठला. काही वेळ पत्नीशी बोलला. हॉलमध्ये जाऊन टीव्ही पाहतो असे सांगून तो खाली आला. वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा मेसेज नातेवाईकांना व्हॉटसऍपवर पाठवले होते. मेसेज पाठवल्यानंतर त्याने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती समजताच एमएचबी पोलीस घटनास्थळी आले. एमएचबी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
8 दिवसांपासून होता नैराश्यात
वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळलेला अमोल हा आठ दिवसांपासून नैराश्यात होता. पोलिसांनी अमोलच्या भावाचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्याने नेमके किती कर्ज घेतले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


























































