बेपत्ता क्रूच्या शोधासाठी ‘साइड स्कॅन सोनार’चा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तौकते’ चक्रीवादळाने अरबी समुद्रात बुडालेल्या ‘पी-305’ जहाजावरील 261 कर्मचाऱयांपैकी 13 जणांचा शोध नौदलाच्या वतीने अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत 60 जणांचे मृतदेह हाती लागले असून 188 जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. ‘पी-305’ सह आणखी एक ‘वरप्रदा’ नावाच्या बोटीवरील 11 जण बेपत्ता आहेत. त्यामुळे ‘बचाव मोहिमे’च्या मदतीला नौदलाची ‘आयएनएस मकर’ धावून आली आहे. समुद्राच्या तळापर्यंतचे छायाचित्र घेण्याची क्षमता असलेल्या ‘साइड स्पॅन सोनार’ द्वारे ही नौका रात्री उशिरा मोहिमेत सामील झाली आहे. परंतु दुर्घटनेला तब्बल 80 हून अधिक तास उलटल्याने आता कोणी जिवंत असण्याची आशा हळूहळू मंदावत चालली आहे.

नौदल आणि तटरक्षक दलाच्या मदतीने अरबी समुद्रात सुरू असलेल्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’चा हा सहावा दिवस असून बेपत्ता लोकांच्या शोधासाठी ‘साइड स्पॅन सोनार’ आणि ‘आयएनएस तरासा’ तसेच ‘आयएनएस मकर’चे पानबुडे समुद्राचा तळ ढवळून काढत आहेत. ‘पी-305’ च्या बेपत्ता क्रू मेंबर्समध्ये जहाजाचे कॅप्टन राकेश बल्लभ यांचाही समावेश आहे. त्यांनी वादळ आल्यानंतर समुद्राच्या पाण्यात उडी घेतली होती. त्यांच्यावर जहाजाच्या अन्य कर्मचाऱयांचे जीव धोक्यात घातल्याचा आरोप आहे.

असे शोधकाम करते साइड स्पॅन सोनार

हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करण्यासाठी प्रसिद्ध असलेली ‘आयएनएस मकर’ हिला दुर्घटनेनंतर शुक्रवारी रात्री उशिरा कर्नाटकच्या बंदरातून मुंबईच्या अरबी समुद्र किनाऱयावर आणण्यात आले आहे. समुद्रात दृश्यमानता कमी झाल्यानंतर मोठय़ा क्षेत्रातील शोधकार्यासाठी ‘साइड स्पॅन सोनारचा’ वापर केला जात असतो. हाय रिझोल्यूशनच्या या सोनार सिस्टीमने समुद्राच्या तळाशी पडलेल्या वस्तूची स्पष्ट प्रतिमा घेता येते. अशा वस्तूची ओळख पटली की पाणबुडे समुद्रात उडी मारून त्या वस्तू किंवा व्यक्तीचे रेस्क्यू ऑपरेशन करू शकतात.

रायगडच्या समुद्रकिनारी दोन दिवसांत पाच मृतदेह सापडले, बुडालेल्या बार्जमधील खलाशी असण्याची शक्यता

रायगड समुद्रकिनाऱयावर दोन दिवसांत पाच मृतदेह सापडले आहेत. हे सर्व मृतदेह ‘तौकते’ चक्रीवादळात खोल समुद्रात बुडालेल्या ‘पी 305’ बार्जवरील खलाशांचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलिबाग तालुक्यातील सासवणे येथे एक, आवास येथे एक, नागाव येथे दोन आणि मुरुड समुद्रकिनारी एक असे पाच मृतदेह समुद्राच्या पाण्यात वाहून किनाऱयाला लागले आहेत. दोन दिवसांत पाच मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मृतदेहांची ओळख अजून पटलेली नाही. ‘तौकते’ चक्रीवादळात समुद्रात ओएनजीसीची ‘पी 305’ ही बार्ज बुडाली असून या दुर्घटनेत अनेक खलाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. रायगडच्या समुद्रकिनारी सापडलेले पाच मृतदेह हे बुडालेल्या बार्जवरील खलाशांचे आहेत का, याचा तपास रायगड पोलिसांनी सुरू केला आहे.

रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहा डायव्हिंग टीम

‘आयएनएस मकर’ सहा डायव्हिंग टीमसह रवाना झाले आहे. ज्यात प्रत्येक टीममध्ये 5 ते 6 पाणबुडय़ांचा समावेश आहे. या टीम पाण्यात बुडलेल्या बार्जच्या आत कदाचित कोणी अडकलेले तर नाही ना याचीही खात्री करणार आहेत. हे पाणबुडे ‘साइड स्पॅन सोनार’ने पुरविलेल्या माहिती आधारे शोधकार्य करीत असल्याची माहिती या ऑपरेशनचे नेतृत्व करणाऱया कमांडर मनोज झा यांनी दिली आहे.

नौदलाच्या सात ‘‘आयएनएस नौका’

नौदलाने आता ‘आयएनएस तरासा’ ही नौकाही ऑपरेशनकरिता पाठवली आहे. चार दशकांतील सर्वात मोठय़ा या ‘रेस्क्यू ऑपरेशन’साठी नौदलाने आपल्या एकाहून एक सरस ‘आयएनएस कोच्ची’, ‘कोलकाता’ शिवाय ‘आयएनएस तेग’, ‘तलवार’ आणि ‘बेतवा’ यांचा समावेश केला आहे. तटरक्षक दलाची ‘सुभद्रा चौहान’, ‘संकल्प’, ‘समर्थ’, ‘सम्राट’, ‘समुद्र प्रहरी’, ‘सचेत’ आणि ‘अपूर्व’ जहाजे आहेत. नौदल आणि तटरक्षक दलाच्या सी किंग आणि चेतक हॅलिकॉप्टरांच्या मदतीला गोव्याहून दोन हलक्या वजनाची हॅलिकॉप्टर्सही पाठवली आहेत. कमी उंचीवरून उडू शकणारी दोन डॉर्निअर विमाने शोधमोहिमेत आहेत.

नातलगांना मुंबईत ये-जा करण्यासाठी ‘‘हेल्पडेस्क’

पी-305 बार्ज दुर्घटनेतील बाधित कर्मचाऱयांच्या नातेवाईकांना मुंबईत येण्यासाठी किंवा आपल्या मूळ गावी परतण्यासाठी सुरू केलेल्या मदतकार्याची मुदत ओएनजीसीने वाढवली आहे. त्यांच्यासाठी हेल्पडेस्कची स्थापनाही केली आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या मदतीकरिता ओएनजीसी हेल्पलाइन पुढीलप्रमाणे (बार्ज पप्पा – 022-26274419, 022-26274420, 022-26274421).