वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी शिलेदार ठरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

इंग्लंडमध्ये 30 मे ते 14 जुलै या कालावधीत होणाऱया वन डे वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाची घोषणा मुंबईत सोमवारी करण्यात आली. अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक, युवा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर आणि फलंदाज लोकेश राहुल यांना अंतिम 15 जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. अंबाती रायुडू व रिषभ पंत या खेळाडूंचे वर्ल्ड कपमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे स्वप्न भंग पावले. रोहीत शर्मा हा मुंबईचा एकमेव खेळाडू टीम इंडियाच्या चमूत आहे. महाराष्ट्राचा मराठमोळा केदार जाधव याचीही संघात निवड करण्यात आली असून तो पहिल्यांदाच प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळणार आहे. बीसीसीआयचे अमिताभ चौधरी, निवड समिती प्रमुख एम.एस.के. प्रसाद व कर्णधार विराट कोहली यांच्या उपस्थितीत मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात हिंदुस्थानचा क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला.

इंग्लंडमधील वर्ल्ड कपसाठी निवड समितीने टीम इंडियात जास्तीतजास्त अष्टपैलू खेळाडूंची निवड केली आहे. केदार जाधव, विजय शंकर, हार्दिक पांडय़ा, रवींद्र जाडेजा व भुवनेश्वरकुमार या अष्टपैलू खेळाडूंना संघात चान्स देण्यात आला आहे. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांच्यासह भुवनेश्वरकुमारवर तेज गोलंदाजीची मदार असेल. तसेच युजवेंद्र चहल, कुलदीप यादव या युवा खेळाडूंना फिरकीची जबाबदारी सांभाळावी लागेल. केदार जाधव व रवींद्र जाडेजा दिमतीला असतीलच. हार्दिक पांडय़ा व विजय शंकर यांना मध्यमगती गोलंदाजीसह फलंदाजीवरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

‘यांना’ फलंदाजी सांभाळावी लागणार

कर्णधारपदाची जबाबदारी अपेक्षेप्रमाणे विराट कोहलीवर असून तोच फलंदाजीचा आधारस्तंभ असणार आहे. शिखर धवन, रोहित शर्मा या सलामी जोडीला प्रतिस्पर्धी गोलदाजांचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. महेंद्रसिंग धोनी यष्टिरक्षणासह मधल्या फळीत फलंदाजी करील. लोकेश राहुलला सलामी तसेच मधल्या फळीत खेळावे लागेल. अर्थात गरज असेल तसा त्याचा फलंदाजी क्रम बदलू शकतो.

2015 वर्ल्ड कपचे सात खेळाडू संघात

आगामी इंग्लंडमध्ये होणाऱया वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या हिंदुस्थानच्या 15 जणांच्या संघात सात खेळाडू हे मागील वर्ल्ड कपचे आहेत. यामध्ये विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, भुवनेश्वरकुमार या खेळाडूंचा समावेश आहे. 2015 साली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे झालेल्या वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा होती. यंदा ती भूमिका विराट कोहली बजावणार आहे.

‘हे’ खेळाडू पहिल्यांदाच खेळणार वर्ल्ड कप

हिंदुस्थानी संघात निवड झालेले काही खेळाडू पहिल्यांदाच मानाच्या स्पर्धेत खेळणार आहेत. महाराष्ट्राचा केदार जाधव, कर्नाटकचा लोकेश राहुल, अष्टपैलू खेळाडू विजय शंकर, हार्दिक पांडय़ा, तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह, फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल व कुलदीप यादव हे क्रिकेटपटू पहिल्यांदाच जागतिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

12 वर्षानंतर ‘तो’ खेळणार मानाच्या स्पर्धेत

रिषभ पंतऐवजी संघात स्थान मिळालेला यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक तब्बल बारा वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. दिनेश कार्तिकने याआधी 2007 सालामध्ये वेस्ट इंडीज येथे झालेल्या वर्ल्ड कपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर 2011, 2015 सालामध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये त्याला टीम इंडियात स्थान मिळाले नव्हते.

यष्टिरक्षण हा खेळाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे या जागेसाठी पर्यायी खेळाडू हवा होता. महेंद्रसिंग धोनीला दुखापत झाल्यास कोणाला संधी देता येईल याचा विचार करण्यात आला. सेमी फायनल किंवा फायनलसारख्या महत्त्वाच्या लढती दबावाखाली कोण चांगला खेळू शकतो यावरही नजर टाकण्यात आली. दिनेश कार्तिककडे रिषभ पंतपेक्षा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली. रिषभ पंत अजून लहान आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे, असे स्पष्टीकरण एम.एस.के. प्रसाद यांनी यावेळी दिले.

वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानचा क्रिकेट संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), विजय शंकर, हार्दिक पांडय़ा, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वरकुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह