मुंबईत भीक मागण्याच्या हद्दीवरून तृतीयपंथीयाची हत्या, दोन तृतीयपंथीयांना अटक

सिग्नलवर भीक मागण्याच्या हद्दीच्या वादातून दोघा तृतीयपंथीयांनी हल्ला करून तिसऱ्याची हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री दहिसर परिसरात घडली. प्रदीप ऊर्फ बाळा ऊर्फ प्राची खोपडे असे त्या मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी पायल शिंदे आणि नरेश थापाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रदीप हा बोरिवली पश्चिम परिसरात होता. तो दहिसर पश्चिम परिसरात सिग्नलवर भीक मागत असायचा. तर पायल आणि नरेश हे दोघे मीरा रोड येथून भीक मागण्यासाठी दहिसर परिसरात येत असायचे. त्या तिघांमध्ये हद्दीचा वाद सुरू होता. बुधवारी रात्री प्रदीप हा राममंदिर रोड सिग्नलजवळ भीक मागत होता. तेव्हा प्रदीपचा पायल आणि नरेशचा वाद झाला. वादानंतर त्या दोघांनी प्रदीपला मारहाण करून चाकूने हल्ला केला. चाकूने हल्ला केल्यानंतर ते दोघे तेथून पळून गेले.

प्रदीपवर चाकू हल्ला झाल्याची माहिती समजताच तेथे तृतीयपंथीय जमले. त्यांनी गर्दी केल्याने काही वेळासाठी वाहतूककोंडी झाली होती. तृतीयपंथीयावर हल्ला झाल्याची माहिती समजताच एमएचबी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी प्रदीपला रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रदीपच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी हत्यचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. काही तासांतच पायल आणि नरेशला एमएचबी पोलिसांनी अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या