
सामना प्रतिनिधी। मुंबई
मुंबईसह राज्यभरातील लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा सोमवारी पार पडणार आहे. या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेने वातावरण ढवळून निघाले आहे. यामुळे विरोधकांची दाणादाण उडणार असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. चौकसभा, गेट मीटिंग, घरोघरी जाऊन उमेदवारांच्या भेटीगाठी घेत टिपेला पोहोचलेला चौथ्या टप्प्यातील प्रचार शनिवारी सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहे.
शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण-मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, ईशान्य मुंबईतून मनोज कोटक, उत्तर-पश्चिम मुंबईतून गजानन कीर्तिकर, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी, उत्तर-मध्य मुंबईतून पूनम महाजन यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. एकीकडे विरोधकांना प्रचारासाठी मुद्दे सापडत नसताना विकासाच्या मुद्दय़ावर महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीचा अंतिम टप्पा आला तरी अद्याप प्रचाराचा सूर गवसलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा धडाका महाराष्ट्रभर सुरू असल्याने शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर यांच्या प्रचारसभांमुळे महायुतीच्या सर्वच उमेदवारांमध्ये जिंकण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुमारे दीड महिन्याहून अधिक काळ राज्यभर धडाडणाऱया या प्रचाराच्या मुलुखमैदान तोफा शनिवारी शेवटच्या टप्प्याच्या 48 तास आधी सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी सैरभैर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना स्वतःला नांदेडमधून विजयाची खात्री नसल्याने निवडणूक झाल्यानंतरही त्यांनी अन्य उमेदवारांच्या प्रचारात फारसा रस घेतलेला नाही. तर दुसरीकडे नगरमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांना खुला पाठिंबा देणाऱया राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राजीनामा ऐन निवडणुकीत स्वीकारण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचारात रस घेतलेला नाही. राष्ट्रवादीत अध्यक्ष शरद पवार वगळता कोणत्याही नेत्याला प्रचाराचा सूर गवसला नाही. यामुळे आघाडीतले वातावरण सैरभैर झाले आहे.
मतदारसंघातील प्रमुख लढती
- नंदुरबार – महायुतीच्या हीना गावीत, महाआघाडीचे के.सी. पाडकी
- धुळे – महायुतीचे डॉ. सुभाष भामरे, महाआघाडीचे कुणाल पाटील, लोकसंग्रामचे अनिल गोटे
- दिंडोरी – महायुतीच्या भारती पवार, महाआघाडीचे धनराज महाले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिवा पांडू गावीत
- नाशिक – महायुतीचे हेमंत गोडसे, महाआघाडीचे समीर भुजबळ, अपक्ष माणिकराव कोकाटे
- पालघर – महायुतीचे राजेंद्र गावीत, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव
- भिवंडी – महायुतीचे कपिल पाटील, महाआघाडीचे सुरेश टावरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. ए. डी. सावंत
- कल्याण – महायुतीचे डॉ. श्रीकांत शिंदे, महाआघाडीचे बाबाजी पाटील.
- ठाणे – महायुतीचे राजन विचारे, महाआघाडीचे आनंद परांजपे
- मावळ – महायुतीचे श्रीरंग बारणे, महाआघाडीचे पार्थ पवार, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील
- शिरूर – महायुतीचे शिवाजीराव आढळराव-पाटील, महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे,
- शिर्डी – महायुतीचे सदाशिव लोखंडे, महाआघाडीचे भाऊसाहेब कांबळे, अपक्ष भाऊसाहेब वाक्चौरे
- उत्तर मुंबई – महायुतीचे गोपाळ शेट्टी, महाआघाडीच्या उर्मिला मातोंडकर
- उत्तर-पश्चिम मुंबई – महायुतीचे गजानन कीर्तिकर, महाआघाडीचे संजय निरुपम
- उत्तर-पूर्व मुंबई – महायुतीचे मनोज कोटक, महाघाडीचे संजय पाटील
- उत्तर-मध्य मुंबई – महायुतीच्या पूनम महाजन, महाआघाडीच्या प्रिया दत्त
- दक्षिण-मध्य मुंबई – महायुतीचे राहुल शेवाळे, महाआघाडीचे एकनाथ गायकवाड
- दक्षिण मुंबई – महायुतीचे अरविंद सावंत, महाआघाडीचे मिलिंद देवरा, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अनिल कुमार































































