मुंबई विद्यापीठात मराठी भाषेची गळचेपी, मराठी माध्यमातून पीएच.डी. करणाऱ्यांना दरवाजे बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुरेंद्र मुळीक । मुंबई

महाराष्ट्रात सर्वत्रच मराठी भाषेचा वापर करावा असे महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट नियम आहेत, पण मुंबई विद्यापीठाने हे सारे नियम पायदळी तुडवून खुलेआम मराठी भाषेची गळचेपी केली आहे. विद्यापीठाच्या या मोगलाई कारभारामुळे मराठी माध्यमातून पीएच.डी. करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे दरवाजे बंद झाले आहेत आणि जे काही विद्यार्थी पीएच.डी. करीत आहेत त्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड पडत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत मुंबई व मुंबई उपनगरासह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिह्यांचा समावेश आहे. यात बहुतांश भाग हा ग्रामीण आहे. मुळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळणे दुरापास्त, त्यातून कोणी मराठी माध्यमातून उच्च शिक्षण घेऊन पीएच.डी.पर्यंत मजल मारली तर विद्यापीठाच्या जाचक नियमामुळे त्याला पीएच.डी.चे दरवाजे बंद होतात. मुळात कोणत्याही विषयात संशोधन करावयाचे असल्यास ते संशोधक विद्यार्थ्याला मातृभाषेतून करणे सोयीचे असते. परंतु मुंबई विद्यापीठात ब्रिटीशकालीन नियम आजही सुरू आहे. मराठी माध्यमातून कोणत्याही विषयात पीएच.डी. करणाऱया विद्यार्थ्याला नाव नोंदणी करण्यासाठी विषय मान्यता प्रस्ताव (Topic Approval) देताना मराठी बरोबरच इंग्रजी भाषेतूनही द्यावे लागते. हा प्रस्ताव 25 ते 30 पानांचा असतो. त्यानंतर प्रबंध पूर्ण होण्याआधी प्रबंधाचा सारांश इंग्रजी भाषेतून द्यावा लागतो. ही पाने 25 ते 30 असतात आणि त्यानंतर प्रबंधाच्या 10 टक्के भाग इंग्रजी भाषांतर करून द्यावा लागतो. अशी एकूण 100 पाने इंग्रजीत भाषांतर करून द्यावी लागतात. ही 100 पाने भाषांतर करण्यासाठी भाषांतराला हजारो रुपये मोजावे लागतात. यामुळे ग्रामीण भागातील पीएच.डी. करणारे हजारो विद्यार्थी या जाचक नियमात भरडले जातात. मग हाच नियम इंग्रजी माध्यमातून पीएच.डी. करणाऱयांना का लागू नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वास्तविक महाराष्ट्रात मराठी माध्यमाला महत्त्वाचे स्थान असावयास हवे होते. ते स्थान मिळावे यासाठी सर्वच राजकीय पक्षांबरोबरच शासकीय यंत्रणाही सतर्क झाली आहे, पण मुंबई विद्यापीठात मात्र मोगलाई सुरूच आहे.

मराठी माध्यमांच्या पीएच.डी. विद्यार्थ्यांवर अनेक वर्षे होत असलेल्या या अन्यायाबाबत अनेक वेळा चर्चा झाली. पण निष्पन्न काहीच झाले नाही. चार वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत हा ठराव एकमताने मंजूर झाला होता. या ठरावात स्पष्टपणे म्हटले होते की, मराठी माध्यमातून पीएच.डी. करणाऱया विद्यार्थ्याकडून विषय मान्यता प्रस्ताव, प्रबंधाचा सारांश आणि प्रबंधाचा दहा टक्के भाग इंग्रजी भाषेतून भाषांतर करून घेऊ नये. इंग्रजी भाषांतराची आवश्यकता नाही, पण या ठरावाची अंमलबजावणी विद्यापीठ प्रशासनाने केलीच नाही आणि ब्रिटीशांचे नियम सुरूच ठेवले.

जर विद्यापीठातील पीएच.डी. प्रस्ताव मंजुरी समितीतील एखाद्या अधिकाऱयाला मराठी भाषा येत नसेल तर त्यात विद्यार्थ्याचा दोष नाही. यासाठी त्या विद्यार्थ्याला इंग्रजीतून भाषांतर करण्याचा भुर्दंड कशासाठी? हे मराठी राज्य आहे. येथे असणाऱया सर्वच अधिकाऱयांनी मराठी भाषा शिकायला हवी, असे शासनाचेही म्हणणे आहे. मग मुंबई विद्यापीठात हा नियम का नाही?

कुलगुरू आणि मराठी माध्यम
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचे मराठी माध्यमाशी घनिष्ट नाते आहे. ते अखंड काळ काम करीत असलेल्या रुईया महाविद्यालयात कला शाखेचे मराठी माध्यमातून पदवीपर्यंत शिक्षण दिले जाते. मुंबईत असे हे एकमेव कॉलेज असावे आणि मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱया याच विद्यार्थ्यांनी रुईया महाविद्यालयाचे नाव सातासमुद्रापार पोहोचविले. यामुळेच कुलगुरू पेडणेकर या विषयात लक्ष घालतील आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना या जाचक नियमातून मुक्त करतील अशी विद्यार्थ्यांना खात्री वाटते.