
मुंबई विद्यापीठाने पीएच.डी. आणि एम.फिल. प्रवेश परीक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले असून या परीक्षेच्या नियोजनाचा भाग म्हणून विद्यापीठाने पुन्हा सराव परीक्षेची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.
यापूर्वी 12 ते 17 मार्चदरम्यान सराव परीक्षेचे आयोजन केले होते. यादरम्यान काही विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या सराव परीक्षा दिली आहे, मात्र ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सराव परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सराव परीक्षा दिली नाही त्यांनी 21 मार्चपर्यंत सराव परीक्षा देण्याचे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली आहे अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा सराव परीक्षा देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार
मुंबई विद्यापीठाने पेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून यानुसार 25 मार्च रोजी एम.फिल. तर 26 आणि 27 मार्च रोजी पीएच.डी. प्रवेश परीक्षा होणार आहे. एकूण 79 विषयांसाठी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून याबाबतचे सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या परीक्षांच्या दरम्यान जर विद्यार्थ्यांस काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्यांना खालील दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल.
(संपर्कासाठी हेल्पलाइन क्रमांक 02228857050, 8291989298, 7700907079, 8657746186, 9372511846, 9372511847).






























































