मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 14 जानेवारीपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 14 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. मुंबई आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडतील.

14 जानेवारीपासून विद्यापीठाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या एमए, एमकॉम, एमएस्सी आदींच्या सेमिस्टर-1 च्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. या सर्व परीक्षा विद्यापीठ स्तरावर ऑनलाइन पद्धतीने होतील, तर कॉलेज पातळीवर होणाऱ्या पदवीच्या बीए, बीकॉम, बीएस्सी यांच्यासोबत सेल्फ फायनान्सच्या सेमिस्टर-1 च्या परीक्षा या 15, 16 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षा जानेवारीअखेरपर्यंत चालणार असून यात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत, यासाठी विद्यापीठाकडून खबरदारी घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारने कोरोना प्रतिबंध निर्बंध जारी केले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा आणि संबंधित कामकाज करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही 50 टक्के ठेवावी लागणार आहे. त्यामुळे काही कामकाजावर परिणाम होतील असे चित्र असले तरी अनेक परीक्षा या महाविद्यालय स्तरावर असल्याने त्या सुरळीत होण्यासाठी विद्यापीठाकडून नुकतीच एक हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोरोना आणि इतर कारणांमुळे अडचणी निर्माण झाल्यास त्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

एलिमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा ऑनलाइन

कला संचालनालयातर्फे घेण्यात येणारी शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी, इंटरमिजिएट) यंदा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा ऑनलाइन घेण्याचा संचालनालयाचा विचार असून त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात परीक्षा घेण्याचे नियोजन संचालनालयाने केले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कला संचालनालयाच्या परीक्षाही ऑनलाइन पार पडणार आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण दिले जातात. या गुणांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी या परीक्षा संपूर्णतः ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबतची माहिती व वेळापत्रक 18 जानेवारीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.