
महिलांच्या परवानगीशिवाय त्यांचे रस्त्यावर चित्रीकरण करत त्यांच्यावर चुकीची शेरेबाजी केल्याप्रकरणी मुंबई शहर सायबर पोलिसांनी एका 46 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सादर आरोपी हा व्लॉगर असून त्याचे नाव ए बटुरिया असे आहे. तो त्याच्या सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ पोस्ट करतो. सध्या त्याला मालाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्यावर चालत असताना कोणीतरी तिच्याबद्दल चुकीची शेरेबाजी करत असल्याचे या विडिओमध्ये दिसत आहे. 21 नोव्हेंबर रोजी या महिलेने मालाड पोलीस ठाण्यात या व्हिडिओबद्दल तक्रार दिली. या महिलेच्या नातेवाईकांनी हा व्हिडिओ पाहिला होता यानंतर नातेवाईकांनी या व्हिडिओबद्दल या महिलेला सांगितल्यावर त्या महिलेला धक्काच बसला.
पोलिसांनी हा व्हिडिओ तपासला आणि तो एका व्लॉगरने पोस्ट केला असल्याचे समजले. या व्लॉगरने त्याच्या कारमध्ये कॅमेरा फिक्स केला होता आणि रस्त्यावरील लोकांचे चित्रीकरण केले होते. हे व्हिडिओ त्याने इंस्टाग्राम व यूट्यूबवर अपलोड केले आहेत. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक विजय चंदनशिवे आणि निरीक्षक मंगेश देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने व्लॉगरचे लोकेशन शोधून त्याला बुधवारी मालाड पश्चिम येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली. दरम्यान आरोपी बटुरिया यांच्यावर आयपीसी कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.



























































