
वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित नसल्यामुळे विजय सिंगच्या कोठडीतील मृत्यूचे नेमके कारण उलगडू शकले नाही. विजयला मारल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, मात्र सीसीटीव्हीच नसल्यामुळे काही प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात राहण्याची शक्यता आहे तर विजयच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोघांना लवकरच अटक केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
विजयला मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी पाठवले जात होते. हॉस्पिटलमध्ये जाताना तो पोलीस ठाण्याबाहेर कोसळला असे पोलिसांचे म्हणणे आहे पण नेमके सत्य काय हे प्रत्यक्ष साक्षीदार आणि त्या वेळेस डय़ुटीवर हजर असलेल्या पोलिसांच्या जबाबानंतर समोर येणार आहे. पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे नातेवाईकांच्या आरोपांचे खंडन करताना पोलिसांना अडचणी येणार आहेत. जर पोलीस ठाण्यात कॅमेरा असता तर मारहाणीचा प्रकार हा कैद झाला असता आणि सत्य काय हे नातेवाईकांना कळले असते. चौकशी होईपर्यंत काही गोष्टींची उत्तरे अनुत्तरित राहणार आहेत. विजयचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होण्याकरिता काही वेळ जाणार आहे. त्याचा व्हिसेरा कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. व्हिसेरा अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले. या संपूर्ण प्रकारांची चौकशी करून त्याचा अहवाल केंद्रीय मानवी हक्क आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे.
दुसऱ्या दिवशीही तणाव
विजयला न्याय मिळावा याकरिता त्याचे नातेवाईक आणि रहिवासी हे मंगळवारी रस्त्यावर उतरले होते तर दुसऱया दिवशी वडाळय़ात तणाव कायम होता. विजयच्या मृत्यूची माहिती समजताच त्याचे मित्र अँटॉप हिलच्या सरदार नगर येथे आले होते. दुपारी ते आयमॅक्सजवळ निदर्शन करणार होते. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, कायदा हाती घेऊ नका असे सांगत विजयच्या नातेवाईकांनी त्याच्या मित्रांची समजूत काढली. दिवसभर विविध शिष्टमंडळे पोलीस ठाण्यात निवेदन घेऊन येत होते.


























































