पाणीपुरवठा करणारे तलाव 80 टक्के फुल! सात तलावांत 1157161 दशलक्ष लिटर पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांत सद्यस्थितीत 1157161 दशलक्ष लिटर म्हणजेच 80 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हे पाणी पुढील 305 दिवसांना पुरणारे आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता सध्या मिटत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांतून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. पालिकेतर्फे वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी उपलब्ध पाणीसाठय़ाचा आढावा घेतला जातो. यावेळी 1447363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. त्यामुळे मान्सूनच्या सुरुवातीपासूनच तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस होणे मुंबईकरांसाठी आवश्यक असते. मात्र या वर्षी सुरुवातीला काहीशी ओढ देणाऱया पावसाने नंतर जोरदार बॅटिंग केल्याने सद्यस्थितीत समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.

असा आहे तलावांतील पाणीसाठा

तलाव पाणीसाठा टक्केवारी

  • अप्पर वैतरणा 148763 दशलक्ष लिटर 66 टक्के
  • मोडक सागर 128692 दशलक्ष लिटर 99.82 टक्के
  • तानसा 143652 दशलक्ष लिटर 99.02 टक्के
  • मध्य वैतरणा 159235 दशलक्ष लिटर 82.28 टक्के
  • भातसा 541076 दशलक्ष लिटर 75.46 टक्के
  • विहार 27698 दशलक्ष लिटर 100 टक्के
  • तुळशी 8046 दशलक्ष लिटर 100 टक्के

तीन वर्षांतील 6 ऑगस्टचा जलसाठा

  • 2019 1279136 दशलक्ष लिटर 88.38 टक्के
  • 2020 600158 दशलक्ष लिटर 41.47 टक्के
  • 2021 1157161 दशलक्ष लिटर 79.95 टक्के