मुंबईकरांसाठी वॉटर टॅक्सीचा भन्नाट पर्याय, डिसेंबरपर्यंत 12 जलमार्गांवर वाहतूक

मुंबईकरांची रस्ते मार्गावरील वाहतूककोंडीतून सुटका करून त्यांना आता जलमार्ग वाहतुकीचा पर्यावरणस्नेही पर्याय देण्यात येणार आहे. मुंबईतून आता रो पॅक्स फेरी सेवेचे चार नवे जलमार्ग तसेच वॉटर टॅक्सीचे 12 नवे जलमार्ग डिसेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत.

सध्या भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) अशा रोपॅक्स सेवेमुळे रस्ते मार्गाने होणारा 110 किलोमीटरचा प्रवास जलमार्गाने 18 किलोमीटर एवढा कमी झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचा रोजचा तीन ते चार तासांचा प्रवासाचा वेळ एक तासापर्यंत कमी झाला आहे. या फेरी सेवेत प्रवाशांना आपली वाहने घेऊन बोटीतून प्रवास करता येत असल्याने मुंबईतील विविध जलमार्गांवर अशाच प्रकारची सेवा सुरू करण्याची योजना आहे. मुंबईसाठीच्या शहरी जलमार्ग वाहतूक प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी एक बैठक घेतली आहे. मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई पोर्टचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाचे अधिकारी तसेच इतर संबंधित या बैठकीला उपस्थित होते.

या 12 मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा

डॉमेस्टीक क्रुझ टर्मिनल ते नेरूळ, बेलापूर, वाशी, ऐरोली, रेवस (रेडी), करंजा (रेडी), धरमतर (रेडी), कान्होजी आंग्रे आयलॅण्ड तसेच बेलापूर ते ठाणे, बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया, वाशी ते ठाणे, वाशी ते गेट वे ऑफ इंडिया अशा 12 मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

या मार्गांवर रोपॅक्स सेवा

रोपॅक्स फेरीचे चार नवे मार्ग सुरू होणार असून त्यात रोपॅक्स टर्मिनल ते नेरूळ (सिडको) हे रस्ते मार्गाने 34 कि.मी.चे आणि 1 तास 25 मि.चे अंतर जलमार्गाने एक तासात कापता येणार आहे. रोपॅक्स टर्मिनल ते काशिद रस्ते मार्गाने 134 कि.मी. आणि 3 तास 30 मि. अंतर जलमार्गाने 2 तासांत (60 कि.मी.) कापता येणार आहे. रोपॅक्स टर्मिनल ते मोरा हे रस्ते मार्गाने 60 कि.मी.चे आणि प्रवासास 1 तास 30 मिनिटे लागणारे अंतर जलमार्गाने अवघ्या 30 मिनिटांत (10 कि.मी.) कापता येणार आहे. करंजा ते रेवस हे रस्ते मार्गाने 70 कि.मी. आणि प्रवासास 1 तास 30 मिनिटे लागणारे अंतर जलमार्गाने 15 मिनिटांत कापता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या