परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखोंचा चुना

लॉकडाऊनमुळे परदेशात नोकरीला जाण्याची संधी हुकली तसेच जे तरुण परदेशातील नोकरीच्या शोधात आहेत अशा बेरोजगारांना हेरून त्यांना रशिया व अन्य देशांत गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवयाचे. त्यांचा पासपोर्ट घ्यायचा आणि बनावट एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रक्ट लेटर, व्हिसा देऊन लाखो रुपये उकळायचे, अशा प्रकारे अनेक बेरोजगारांना चुना लावणाऱ्या पश्चिम बंगालातील भामटय़ांचा गोरखधंदा गुन्हे शाखेच्या युनिट-8 ने उद्ध्वस्त केला.

मालाडच्या एव्हरशाइन मॉलमध्ये श्री कन्सल्टन्सी या नावाने एक कार्यालय असून तेथे परदेशात नोकरीचे आमिष दाखवत बेरोजगारांची फसवणूक केली जात असल्याची खबर युनिट-8 चे एपीआय मनोहर कारंडे यांना मिळाली. त्यानुसार उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक संजीव गावडे, महेश तोगरवाड, एपीआय कारंडे, प्रथमेश विचारे, लक्ष्मीकांत शेलकर, उपनिरीक्षक अमित देवकर, लक्ष्मण वडरे व पथकाने त्या कार्यालयावर छापा टाकला. त्यावेळी तेथे उपस्थित सहा इसमांकडे परदेशातील नोकऱयांबाबत विचारणा केली असता त्यांची बोबडी वळली. त्यांच्याकडे परदेशात मनुष्यबळ पुरविण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही परवाना नव्हता. शिवाय बेरोजगारांना लाखो रुपये घेऊन फसवत असल्याची कबुली त्या भामटय़ांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी अब्दुल हसिम शेख अजादूल इस्लाम (33), शेख मैनुद्दीन शेख मुसूरुद्दिन (44), सपह्रीद शेख शमसुद्दीन शेख (34), मोइनुद्दीन गोल्डर अमिनुद्दीन गोल्डर (34), जयंतपुमार मंडल (38) आणि तरक मनोरंजन मोनडल (32) या पश्चिमबंगालच्या सहा भामटय़ांना बेडय़ा ठोकल्या.

फेब्रुवारी महिन्यात सटकणार होते

लॉकडाऊनमुळे अनेकांना परदेशात नोकरीसाठी जाता आले नव्हते. त्यामुळे ही संधी साधत त्यांनी परदेशी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना फसविण्याचा डाव आखला होता.  फेब्रुवारी महिन्यात आपला गाशा गुंडाळून ते पोबारा करण्याच्या तयारीत होते. पण त्या आधीच युनिट-8 ने त्यांचा खेळ खल्लास केला.

आपली प्रतिक्रिया द्या