विजय हजारे ट्रॉफी – मुंबईच्या विजयाचे ‘पंचक’, हिमाचल प्रदेशचा 200 धावांनी धुव्वा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या मोसमातील पहिल्या स्पर्धेत (सय्यद मुश्ताक अली टी-20) सपाटून मार खाणाऱया मुंबई क्रिकेट संघाने विजय हजारे ट्रॉफी या वन-डे क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीत घवघवीत यश संपादन केले.

मुंबईने सोमवारी हिमाचल प्रदेशचा 200 धावांनी धुव्वा उडवला आणि ‘डी’ गटात सलग पाचव्या विजयासह 20 गुणांची कमाई करीत अव्वल स्थानावर झेप घेतली. सूर्यकुमार यादव, आदित्य तरे व शार्दूल ठाकूर यांची दमदार अर्धशतके व धवल कुलकर्णी, शम्स मुलानी व प्रशांत सोलंकी यांची प्रभावी गोलंदाजी मुंबईच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले.

मुंबईकडून मिळालेल्या 322 धावांचा पाठलाग करणाऱया हिमाचल प्रदेशचा डाव 121 धावांमध्येच गडगडला. प्रशांत सोलंकीने 31 धावा देत चार फलंदाज बाद केले.

निराशाजनक सुरुवात, त्रिमूर्ती आली धावून

मुंबईच्या पहिल्या चार फलंदाजांना या लढतीत अपयशाचा सामना करावा लागला. यशस्वी जैसवाल (2 धावा), पृथ्वी शॉ (2 धावा), कर्णधार श्रेयस अय्यर (2 धावा) व सर्फराज खान (11 धावा) यांच्याकडून निराशा झाली. मात्र 4 बाद 49 या धावसंख्येवरून सूर्यकुमार यादव (91 धावा), आदित्य तरे (83 धावा) व शार्दूल ठाकूर (92 धावा) या तिघांनी मुंबईचा डाव सावरला आणि 321 ही धावसंख्या गाठू देण्यात मोलाची भूमिका बजावली.

सूर्यकुमार यादवने आपल्या खेळीत 15 चौकार चोपून काढले. आदित्य तरेने एक षटकार व सहा चौकार मारले, तसेच शार्दूल ठाकूरने सहा षटकार व सहा चौकारांची बरसात करीत आपली खेळी सजवली.