
संपूर्ण मुंबईत कोरोना आटोक्यात येत असतानाच एका वेळी ‘कोरोना हॉटस्पॉट’ ठरलेल्या पालिकेच्या जी-दक्षिण म्हणजेच वरळी विभागात आता एकही कंटेनमेंट झोन किंवा सील इमारत राहिली नाही. त्यामुळे वरळीने आता मोकळा श्वास घेतला आहे. जी-दक्षिण विभागात आतापर्यंत 9984 जणांनी कोरोनाला हरवले असून या ठिकाणी आता फक्त 197 सक्रिय कोरोना रुग्ण राहिले आहेत.
दाटीवाटीचा परिसरात अणि टोलेजंग इमारती असलेल्या जी-दक्षिण विभागात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा झपाटय़ाने प्रसार झाला. त्यामुळे या विभागात कोरोना रोखण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र संबंधित विभागात पालिकेने घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, औषधोपचार आणि जनजागृतीबरोबरच ‘डॉक्टर आपल्या दारी’, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, प्रभावीपणे सॅनिटायझेशन, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या ठिकाणी स्वयंचलित निर्जंतुकीकरण यंत्रणा, विभागात सुरू करण्यात आलेल्या काही कोरोना केअर सेंटरमध्ये मानवी संपर्प टाळण्यासाठी रोबोटचा वापर, ड्रोनच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण-कीटकनाशक फरवारणी मोहीम अशा प्रभावी उपाययोजना केल्यामुळे आता कोरोना चांगलाच नियंत्रणात आला आहे. जी-दक्षिण विभागात आता कोरोना वाढीची सरासरी 0.09 टक्क्यावर आली आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 801 दिवसांवर पोहोचला आहे. दरम्यान, जी-दक्षिण विभागात आतापर्यंत 10772 जणांना कोरोना झाला असून 9984 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 552 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
वांद्रे, बोरिवली, भायखळय़ात स्थिती सुधारली
- वरळीनंतर पालिकेच्या एच पश्चिम म्हणजेच वांद्रे पश्चिम, भायखळा विभागात 1 कंटेनमेंट झोन तर आर मध्य म्हणजेच बोरिवलीतही एकही कंटेनमेंट झोन शिल्लक राहिला नाही. दरम्यान, सी वॉर्ड म्हणजेच मरीन लाइन्स विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी मुंबईत सर्वाधिक 1151 दिवस झाला आहे.
- वांद्रे पश्चिम विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी 508 दिवस तर सरासरी रुग्णवाढ 0.14 टक्के, भायखळा रुग्ण दुपटीचा कालावधी 633 दिवस आणि सरासरी रुग्णवाढ 0.11 टक्के आणि बोरिवलीत रुग्ण दुपटीचा कालावधी 685 दिवस आणि सरासरी वाढ 0.10 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.


























































