मुंबईतील पहिले ई-ऑटोरिक्षा विक्री दालन सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भविष्यात इंधनावरील वाहनांना प्रदूषणविरहित आणि बचतीचा योग्य पर्याय म्हणून शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेच्या पुढाकाराने आणि ए व्ही मोटर्स यांच्या माध्यमातून आज मुंबईतील पहिले ई-ऑटोरिक्षा विक्री दालन सुरू करण्यात आले. शिवसेना नेते, माजी मंत्री, खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते पियाजो अॅपे कंपनीच्या प्रवासी आणि मालवाहतुक या दोन्ही वर्गवारीतील ई-ऑटोरिक्षा वाहनांचे अनावरण आणि वाहने खरेदी केलेल्या ग्राहकांना चाव्यांचे वितरण यावेळी करण्यात आले.

केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशात आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाने देखील ई-वाहन धोरणास यापूर्वीच मान्यता दिली आहे. शिव वाहतूक सेनेने संघटनेच्या सदस्य ऑटोरिक्षा चालकांना ई-ऑटोरिक्षा वाहन खरेदीवर विशेष सवलतीचा लाभ देऊ केला आहे. इंधनावर चालणाऱया वाहनांमुळे होणारे मानवी शरीरास हानिकारक असे कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी आणि गोरगरीब रिक्षाचालकास कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन हा भविष्यासाठी अतिशय उत्तम पर्याय ठरेल असे प्रतिपादन गजानन किर्तीकर यांनी केले. प्रसंगी राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त सचिन गिरी, शिव वाहतूक सेनेचे माजी सरचिटणीस मोहन गोयल, प्रमोद सावंत, कमलेश राय, सुधांशु तलवार, नितिन दिघडे, विनय मोरे, मयूर पंचाळ, अजय जैन, पीयूष जैन आदी मान्यवर उपस्थित होते.