
आयपीएल 2026 च्या हंगामातील मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या पहिल्याच सामन्यात एक मोठा निर्णय पाहायला मिळाला. हिंदुस्थानला टी-20 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव याला मुंबई इंडियन्सने थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये न ठेवता ‘इम्पॅक्ट सब’ म्हणून राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान दिले आहे.
वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ए.एम. गझनफर याने आज मुंबईसाठी पदार्पण केले. तसेच मुंबईने क्विंटन डी कॉकच्या ऐवजी रायन रिकलटनला सलामीला संधी दिली आहे.
मुंबईने संघात अष्टपैलू शार्दुल ठाकूरला स्थान देऊन फलंदाजीची खोली वाढवण्यात आली आहे, तर फिरकी गोलंदाजीसाठी अतिरिक्त पर्याय ठेवण्यात आला आहे.
सूर्यकुमार फलंदाजी करणार?
सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असून २०१२ मध्ये त्याने या संघासाठी पदार्पण केले होते. आता सामन्याच्या परिस्थितीनुसार, दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून त्याला मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. घरच्या मैदानावर (वानखेडे) होत असलेल्या या सलामीच्या सामन्याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे.





























































