
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या अभियंत्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर आता 11 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. न्यायाधीश जी.टी. पवार यांच्या न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱयांना मंगळवारी सर्व पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रेल्वे अधिकारी व रेल्वे पोलिसांना अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी ठाणे जीआरपी पोलिसांनी रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अभियंत्यांच्या वकील बलदेव राजपूत यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान राजपूत यांनी युक्तिवाद करत पाच वरिष्ठ रेल्वे अधिकाऱयांनी सादर केलेल्या अहवालात अतिरिक्त गर्दीमुळे अपघात झाल्याचे नमूद केल्याचे सांगितले. तसेच हा अहवाल जर आधीच पोलिसांकडे दिला असता तर एफआयआर दाखल झाला नसता, असा युक्तिवाद केला. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी सादर केलेल्या रिपोर्टनंतर पुढील निर्णय होण्याची शक्यता अॅड. बलदेव राजपूत यांनी व्यक्त केली.
जीआरपीने कर्तव्य बजावले नाही
जीआरपीचे काम होते पायदानावरील अतिरिक्त प्रवाशांना हटवणे, परंतु त्यांनी आपले कर्तव्य बजावले नाही. त्यामुळे ही चूक जीआरपीची आहे. अपघाताच्या दिवशी सुमारे 200 गाडय़ा त्याच पटरीवरून धावल्या, जर काही तांत्रिक बिघाड असता तर आणखी अपघात झाले असते, असा दावा अॅड. राजपूत यांनी युक्तिवादादरम्यान केला आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्रे आणि अपघाताचा संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला असून, मंगळवारी या सर्व पुराव्यांच्या तपासणीनंतर न्यायालय निर्णय देणार आहे.


























































