
महागनरपालिका निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होईल, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आजपासून आचारसंहिताही लागू झाली.
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. ही निवडणूक ईव्हीएमवर होणार असून उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. महानगरपालिका निवडणुकांसाठी 39147 मतदान केंद्र असणार आहेत. यातील 10,118 मतदान केंद्र बीएमसीसाठी असतील. तर कंट्रोल युनीट 11,349 आणि बॅलेट युनीट 22000 असणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
महानगरपालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ला अधिसूचित केलेली यादी ग्राह्य धरली जाणार आहे. विरोधकांनी या यादीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतरही हीच यादी महानगरपालिका निवडणुकांसाठी वापरण्या येणार आहे. सदर यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली असून यातील नाव वगळणे किंवा नव्याने टाकणे राज्य निवडणूक आयोगाच्या हातात नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दुबार मतदारांपुढे डबल स्टार
विधानसभा निवडणुकीनंतर दुबार मतदारांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. याविरोधात विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाही काढला होता. आता महानगरपालिकांसाठी संभाव्य दुबार मतदारांची ओलख पटवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले असून त्यांच्यापुढे डबल स्टार मार्क लावण्यात आलेला आहे. दुबार मतदारांना शोधण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले असून मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार हे लिखित घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार होते अशी कबुलीही निवडणूक आयोगाने दिली.
महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम –
- नामनिर्देशन स्वीकारण्याचा कालावधी – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025
- नामनिर्देशन पत्राची छाननी – 31 डिसेंबर, 2025
- उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी, 2026
- निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी – 3 जानेवारी, 2026
- मतदानाची तारीख – 15 जानेवारी, 2026
- मतमोजणी – 16 जानेवारी, 2026
महत्त्वाचे मुद्दे –
– महानगरपालिका निवडणुकांसाठी ‘मताधिकार मोबाईल अॅप’ विकसित करण्यात आले आहे.
– मतदान केंद्रावर वयोवृद्ध, दिव्यांग, तान्हे बाळ असणाऱ्या मातांना प्राधान्य
– मतदान केंद्रावर रॅम्प, व्हिलचेअर, वीज, पिण्याचे पाणी, सावली आणि शौचालयाची व्यवस्था
– महानगरपालिका निवडणुकांसाठी 290 निवडणूक अधिकारी, 670 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 1 लाख 96 हजार 605 अधिकारी
– स्टार कॅम्पेनरची संख्या 20 वरून 40 करण्यात आली
– 29 महानगरपालिकेत एकूण जागा 2869 आहेत. यापैकी महिलांसाठी 1442, अनुसुचित जातीसाठी 341, अनुसुचित जमातीसाठी 77 आणि मागास प्रवर्गासाठी 759
– बीएमसीसारख्या अ वर्गातील महानगरपालिकांसाठी निवडणूक खर्च 15 लाख. ब वर्गातील महानगरपालिकांसाठी 13 लाख, क वर्गातील महानगरपालिकांसाठी 11 लाख आणि ड वर्गातील महानगरपालिकांसाठी 9 लाख



























































