पालिका शाळेतील विद्यार्थ्याने दाखवली विज्ञानाच्या पुस्तकातील चूक; बालभारतीने दिले दुरुस्तीचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या शाळेत दहावीत शिकणाऱया गौरव शुक्ला या विद्यार्थ्याने सखोल वाचनाच्या बळावर दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या इंग्रजी माध्यमाच्या पाठय़पुस्तकातील चूक बालभारतीच्या लक्षात आणून दिली आहे. गौरवच्या या निरीक्षण क्षमतेचे सर्वत्र  कौतुक होत आहे.

शिवडीतील गौरव शुक्ला साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात शिकत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग – 2 विषयाचा अभ्यास करताना त्याला एक चूक लक्षात आली. पुस्तकातील पान क्रमांक 81 वरील पाठ क्रमांक 8 मध्ये अमिनो ऍसिडसंदर्भातील एक तक्ता आहे. यातील केवळ पहिला पर्याय हा अमिनो ऍसिडशी संबंधित असून अन्य पर्यायांचा अमिनो ऍसिडशी कोणताही संबंध नव्हता. गौरवने बालभारतीला ई-मेल करीत ही चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली. बालभारतीने गौरवने नोंदविलेल्या चुकीची दखल घेतली असून सदर चुकीची दुरुस्ती पुढील वर्षीच्या पाठय़पुस्तकात करण्यात येणार असल्याचे बालभारतीच्या शास्त्र्ा विभागाचे विशेषाधिकारी डॉ. प्रवीण मोहिते यांनी सांगितले. तसेच गौरवला पत्र लिहून त्याचे अभिनंदन केले.

मागील काही वर्षे विद्यार्थी अमिनो ऍसिडविषयी चुकीची माहिती अभ्यासत होते. ही चूक माझ्या लक्षात आल्यावर सर्वात आधी शिक्षकांना सांगितले. अखेरीस बालभारतीला ई-मेल केला. बालभारतीकडून माझ्या या सूचनेविषयी मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यासाठी मी खूपच आनंदी आहे. 
– गौरव शुक्ला