महापालिका, नगरपालिकांना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, नगरविकासमंत्र्यांचे प्रतिपादन

eknath-shinde

मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत राज्यातील कुठल्याही महानगरपालिका व नगरपालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.

नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत निधी मिळाला नसल्याबद्दल प्रवीण दटके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते विधान परिषदेत बोलत होते. कोरोना संकटामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता तसेच राज्याच्या उत्पन्नावरही मर्यादा आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्राधान्यक्रमाने विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नागपूर महानगरपालिकेत कुठलीही विकासकामे थांबवण्यासाठी नगरविकास विभागाने आदेश दिलेला नाही. ज्या कामांचे कार्यादेश निघाले आहेत ती कामे थांबणार नाहीत आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती शिंदे यांनी दिली. कोकणातील ज्या नगरपालिकांची स्थिती बेताची आहे त्यांना मूलभूत सोयीसुविधांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही शिंदे यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

आष्टी, शिरूर नगर पंचायतीच्या विकास आराखडय़ाला तत्काळ मंजुरी देणार

बीड जिह्यातील आष्टी व शिरूर नगर पंचायतीच्या विकास आराखडय़ास मंजुरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्यास तातडीने मंजुरी दिली जाईल तसेच पाटोदा नगर पंचायतीचा विकास आराखडय़ाचा फेर प्रस्ताव विहित मुदतीत सादर करण्याचे आदेश सहाय्यक संचालक नगर रचना, बीड यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

 नगरपालिकांच्या विकास आराखडय़ातील आरक्षणाबाबत कुणाच्या तक्रारी आल्या तर त्याची गुणवत्तेनुसार चौकशी केली जाईल. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असेही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या