
दोन दिवसांपूर्वी एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणावरून आणि शुक्रवारी (दि.1) सकाळी झालेल्या बाचाबाचीतून तिघांनी धारदार शस्त्रांच्या साहाय्याने सराईताचा खून केल्याची घटना दुपारी ईश्वरपूर-ताकारी रस्त्यावरील आरआयटी कॉलेजच्या समोर घडली. याप्रकरणी एकासह दोन अल्पवयीन मुलांवर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. रोहित ऊर्फ बारक्या पंडित पवार (वय 23, रा. बेघर वसाहत, ईश्वरपूर) असे मृताचे नाव आहे. हौसेराव कुमार आंबी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
रोहित पवार आणि आरोपींची एकमेकांशी जुनी ओळख होती. दोन दिवसांपूर्वी रोहित याने या गुन्ह्यातील एका अल्पवयीनच्या घरी जाऊन त्याला दमदाटी केली होती. त्यानंतर आज रोहित आणि हौसेराव हे दुपारी कॉ लेजजवळ एकमेकांसमोर आले. त्यावेळी दोन दिवसांपूर्वी एकमेकांकडे रागाने पाहण्यावरून झालेल्या बाचाबाचीवरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रोहित याच्याकडे आधीच धारदार शस्त्र होते. तर, त्या तिघांपैकी एकाकडे चाकू होता.
रोहित मारणार हे लक्षात येताच, त्यांनी त्यांच्याकडील शस्त्राने रोहितवर वार केले. त्यानंतर मारेकऱ्यांनी थेट ईश्वरपूर पोलीस ठाणे गाठले. तर, जखमी रोहितला लोकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, आरोपींनी तो आम्हाला मारणार होता म्हणून आम्हीच त्याला मारले, अशी कबुली पोलिसांना दिली. प्रभारी पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. अतिरिक्त पोलीस संचालक कल्पना बारवकर यांनीही सायंकाळी पोलीस ठाण्यात भेट देऊन तपासात वैयक्तिक लक्ष घातले.