
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
गाढे जळगाव येथील खाटीक मजीद बबन कुरैशी याचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघडकीस आले. ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांत त्याचा खून केल्याचा आरोप असलेल्या तिघा भावंडांना अटक केली आहे. या तिघांना करमाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
करमाड रोडवरील गाढेजळगाव येथील रहिवासी मजीद बबन कुरैशी (४०) जनावरांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी सकाळी रेल्वे पुलाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी रात्री लाठ्याकाठ्या आणि लोखंडी फुकणीने खून करून मजीद कुरैशीचा मृतदेह फेकण्यात आलेला होता. त्यावरून करमाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले, पोलीस निरीक्षक बालक कोळी, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी श्वानास वास दिला असता ते परिसरातच घुटमळल्याने पोलिसांचा संशय बळावला.
२४ तासांत तिघांना अटक
खुनाच्या घटनेनंतर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संजय आहिरे, सत्यजित ताईतवाले, उपनिरीक्षक प्रदीप भिवसने, शरद रोडगे, भगतसिंग दुलत, रवींद्र साळवे, ढवळसिंग महेर, रमेश धस, महिला कर्मचारी भारती राठोड, अलका बर्डे, अर्चना साळुंके, सीमा चव्हाण, शीतल वाटोरे आदींनी तपासाची चक्रे फिरवत नेमीनाथ पांडुरंग राऊत व त्याचा लहान भाऊ देवीदास, बिभिषण राऊत या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच तिघांनी मजीद कुरैशी याचा खून करून मृतदेह रेल्वे पटरीजवळ फेकून दिल्याची कबुली दिली. मजीद कुरैशी याचे देवीदासच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची कुणकुण तिघांना लागलेली होती. मंगळवारी मध्यरात्री मजीद कुरैशी हा देवीदासच्या घरी गेला असता नेमक्या त्याचवेळी देवीदास लघुशंकेसाठी उठला. सारा प्रकार लक्षात आल्यानंतर तिघांनी लाठ्याकाठ्यांनी आणि लोखंडी फुकणीने माजीद कुरैशी याचा खून केला, अशी कबुली तिघांनी दिली आहे.































































