हिंदू तरुणीशी लग्न करण्यासाठी मुसलमान तरुणाने केले धर्मांतर…वाचा सविस्तर….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरियाणा सरकार राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा करण्याचा विचार करीत आहे. त्याचवेळी हिंदू तरुणीशी लग्न करण्यासाठी मुसलमान तरुणाने धर्मांतर केल्याची घटना घडली आहे. यमुनानगर जिल्ह्यातील एका मुसलमान तरुणाने हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू विधी आणि परंपरेनुसार मंदिरात मुलीशी लग्न करण्यापूर्वी त्याने धर्मांतर करुन स्वतःचे नाव बदलले आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या नवविवाहितांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

हिंदू तरुणी 19 वर्षांची असून तरुण 21 वर्षांचा आहे. त्यांनी न्यायालयात धाव घेत, मुलीच्या कुटुंबीयांकडून जीवीताला धोका असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तरुण एका खासगी कंपनीत नोकरी असून त्याला महिन्याला 15 हजार रुपये पगार आहे. आपले कटुंबीय या विवाहासाठी तयार आहेत. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध असल्याचे तरुणाने न्यायालयाला सांगितले.

मुलीच्या कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात 9 नोव्हेंबर रोजी आम्ही मंदिरात लग्न केले. त्याआधी आपण स्वच्छेने हिंदू धर्म स्वीकारला आणि नावही बदलले. मुलीच्या कुटुंबीयांना लग्नाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आम्हाला दिली. त्यामुळे आमच्या जीवीताला धोका असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.

तरुणी सज्ञान असून आपण स्वच्छेने धर्मांतर केले आहे. त्यामुळे या विवाहाला विरोध करणे हे घटनेच्या कलम 21 चे उल्लंघन आहे. तसेच आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर घाला आहे. तसेच याचे गंभीर परिणाम भोगण्याची आणि आम्हांला वेगळे करण्याची धमकी मुलीच्या कुटुंबीयांनी दिली आहे, असे न्यायालयात याचिका दाखल करून त्यांनी सांगितले.

या प्रकरणी 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणीला एकदा भेटण्याची विनंती केली. मात्र, तरुणीने कुटुंबीयांना भेटण्यास नकार दिला. त्या दोघांच्या जीवीताला असलेला धोका लक्षात घेत न्यायालयाने यमुनानगर पोलिसांना त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत.