
एपस्टिन प्रकरणासंदर्भात नवीन माहिती समोर आल्यानंतर, अखेर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. गेट्स फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी अलीकडेच त्यांच्या चुकांची जबाबदारी घेतली आहे. टाउन हॉलच्या बैठकीत गेट्स यांनी कर्मचाऱ्यांसमोर दिलगिरी व्यक्त केली आहे. बैठकीदरम्यान, गेट्सने कबूल केले की एपस्टिनसोबत संबंध प्रस्थापित करणे तसेच त्यांच्यासोबत वेळ घालवणे ही एक मोठी चूक होती. याचसोबतच टाउन हॉलमध्ये, गेट्स यांनी एपस्टिन फाइल्समध्ये उल्लेख केलेल्या रशियन महिलांसोबत संबंध असल्याचे कबूल केले. परंतु यावर अधिक बोलताना ते म्हणाले, या सर्वाचा एपस्टिन पीडितांशी कोणताही दुरान्वये संबंध नाही.
यावेळी गेट्स यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले की, ते एपस्टिनच्या गुन्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारे सहभागी नव्हते. फाउंडेशनने एक निवेदन देखील जारी केले की, गेट्स यांनी एपस्टिनला कधीही कोणतेही आर्थिक सहाय्य, देणग्या किंवा रोजगार दिलेला नाही. तरीही उघड झालेल्या कागदपत्रांमुळे वाद पुन्हा निर्माण झाला आहे आणि प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गेट्स यांनी यावेळी असेही कबूल केले की, त्यांची माजी पत्नी मेलिंडा गेट्स यांनी २०१३ मध्येच त्यांना एपस्टिनपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. परंतु त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. गेट्स यांनी बैठकीमध्ये त्यांनी काहीही बेकायदेशीर केले नसल्याचे सांगितले. बैठकीत ते म्हणाले, एपस्टिनसोबत वेळ घालवणे आणि गेट्स फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांची ओळख करून देणे ही मोठी चूक होती. गेट्स म्हणाले, “माझ्या चुकीमुळे ज्यांना या वादात ओढले गेले त्यांची मी माफी मागतो.”
इतकेच नव्हे तर यावेळी गेट्सने कबूल केले की, एपस्टिनसोबत असलेले त्यांचे संबंध उघड झाल्यामुळे, फाउंडेशनच्या प्रतिमेवर वाईट परिणाम झाला आहे. ते म्हणाले, “हे फाउंडेशनच्या मूल्यांच्या आणि उद्दिष्टांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. आमचे काम अत्यंत प्रतिष्ठेच्या बाबतीत संवेदनशील आहे. आता लोकांनी आमच्यासोबत काम करायचे की नाही हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे.”
गेट्स फाउंडेशनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गेट्स वर्षातून दोनदा टाउन हॉल बैठक आयोजित करतात आणि यावेळी त्यांनी उघडपणे प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्यांच्या कृतींची जबाबदारी घेतली.


























































