
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सरसावले आहे. यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम उद्या, मंगळवारपासून सुरू होत आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा असे शहरांपासून ते प्रत्येक गाव, खेडय़ापर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. उद्यापासून राज्यातील प्रत्येक घराघरात जाऊन कोरोनाबाधित व्यक्तीचा शोध घेतला जाणार असून अन्य आजारांसाठीही तपासणी केली जाणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याभरातील यंत्रणेचा आढावा घेतला.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेसंदर्भात राज्यातील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, मुंबई महापालिकेचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी, अन्य महापालिका यांच्यासोबत आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, लॉकडाऊन काळात आपण कोरोनाची लाट थोपविली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करीत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी होत आहे. लाखो परप्रांतीय मजूर परत राज्यात आले आहेत. एकूणच कोरोनाची वाढती संख्या पाहता कोरोनासोबत कसे जगायचे ते आता शिकवावे लागणार आहे. रोग होऊच न देणे हा मंत्र महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपली आरोग्यपथके घरोघरी भेट देऊन सूचना देतील. या बैठकांना आरोग्यमंत्री राजेश टोपे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री ऍड. अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह पालिकेतील अधिकारी उपस्थित होते.
ऑक्सिजन टँकर्सना सायरन
ऑक्सिजन वाहून नेणाऱया टँकर्सना आपत्कालीन वाहनांचा दर्जा देण्याचा निर्णय झाला असून त्यावर सायरन असतील. त्यांची वाहतुक रोखू नये तसेच दिवसादेखील वाहतूक शहरांत सुरू राहील असे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी सांगितले. याविषयीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे
अशी राबवली जाणार मोहीम
महापालिकेचा एक कर्मचारी व दोन स्वयंसेवक अशा एकूण तिघांची टीम महापालिका क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधून त्यांची कोरोनासाठी प्राथमिक पडताळणी करेल.
राज्यातही अशाच टीम बनवल्या जातील.
टीमकडे एक तापमापक (थर्मामीटर), शरीरातील प्राणवायू प्रमाणाची पडताळणी करणारे यंत्र (ऑक्सिमीटर) आणि एक नोंदवही असेल.
ही लोकचळवळ व्हावी!
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात सुरू होणारी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम केवळ मोहीम न राहता लोकचळवळ व्हावी आणि या चळवळीत प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापलिका अधिकाऱयांना या बैठकीदरम्यान केले. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी ‘मास्क’चा सुयोग्य वापर करणे, वारंवार साबणाने हात धुणे आणि दोन व्यक्तींमध्ये दोन मीटरचे सुरक्षित अंतर सातत्याने राखणे या त्रिसूत्रीसह विविध मार्गदर्शक सूचनांबाबत नागरिकामंध्ये जनजागृती करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

























































