अनवट काही- पारदर्शी आत्मकथन

>> अशोक बेंडखळे

‘माझे पुराण’ हे सौ. आनंदीबाई कर्वे ऊर्फ बाया कर्वे यांचे  आठवणीवजा आत्मकथनाचे पुस्तक. बाया कर्वे म्हणजे आयुष्यभर ज्यांनी निराधार स्त्रियांच्या उद्धाराचे काम केले, त्या भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या द्वितीय पत्नी होत. एकोणऐंशी पानांचे हे छोटेसे आत्मकथन. मात्र त्यात असलेला लेखनऐवज खूप अनमोल आहे आणि आनंदीबाईंचे लेखन कसब त्यांच्या सरळसाध्या शैलीमध्ये तसेच स्पष्टपणामध्ये आहे हे लक्षात येते.

‘माझे पुराण’ हे पुस्तक जून 1944 मध्ये केशव भिकाजी ढवळे ( गिरगाव) प्रकाशनाने प्रसिध्द केले. म्हणजे त्यालाही आता एंsशी वर्षाहून अधिक काळ लोटला. त्या काळात अकाली विधवा झालेल्या स्त्रियांना कुठल्या दिव्यातून जावे लागे, सासरी कुठले कष्ट उपसावे लागत, पुनर्विवाहानंतर आलेले हे दुःखद प्रसंग, चार मुलांना वाढवताना कुटुंबासाठी खाल्लेल्या खस्ता, अनेक निराधार मुलांना घरी दिलेला आश्रय, आयुष्यात घडलेले काही समर प्रसंग हे सगळे त्यांनी मोकळेपणी सांगितले आहे.

पुस्तकाचा प्रारंभ बाया ऊर्फ गोदा (हे माहेरचे नाव) हिच्या बालपणातील आठवणींपासून होतो. गोदाचे वडील बाळकृष्ण केशव जोशी रत्नागिरी जिह्यातील देवरुखचे. शांत स्वभावाचे नि सर्व कामे धिमेपणाने करणारे तर आई कामसू व खरमरीत स्वभावाची, शिस्तप्रिय होती. तिने मुलांना चांगले वळण लावले होते. गोदूची मोठी बहीण आक्काच्या ओळखीने माखजनचे विधुर गृहस्थ नातू यांचे स्थळ गोदूसाठी सुचवण्यात आले. त्यावेळी गोदूचे वय होते आठ वर्षे. त्या काळात मुलगी तेरा वर्षांपर्यंत लग्नाची राहत नसे. मुलींचे शिक्षण बघत नसत, तर तिची काठीने उंची मोजून बघत. लग्नाला तीन महिने होतात न होतात तो नातू वारल्याचे मुंबईहून पत्र आले आणि गोदाताई विधवा झाल्या. मुलगा अकाली जाऊनही सासरची माणसं मोठय़ा मनाची निघाली. त्यांनी सुनेला मुलासारखे मानत सासरी बोलावले. गोदूताई सासरी सोवळी होईपर्यंत साधारण बाराएक वर्षे राहिल्या.

गोदूताईंची सासू प्रेमळ होती. मात्र सुनेनं विकेशा झालंच पाहिजे असा त्यांचा हट्ट होता. विकेशाच्या जाचातून गोदूची सुटका तिचा मोठा दादा नरहरपंत यांनी केली. ते त्यांचे मित्र प्रो. धोंडो केशव कर्वेंबरोबर मुंबईत चाळीत राहायचे. त्या सर्व 13- 14 मंडळींचे कर्व्यांच्या पहिल्या पत्नी राधाबाई एकटीने करीत. त्यांना मदत व्हावी म्हणून दादाने गोदूला देवरुखहून परस्पर मुंबईला नेले व तिचे सासर सुटले. वडिलांनी पुढाकार घेतल्यामुळे गोदूचा प्रो. कर्वेंशी पुनर्विवाह झाला आणि गोदूच्या त्या सौ. आनंदी कर्वे झाल्या. हा एवढाच फरक झाला नाही, तर त्या वेळी समाजमन ढवळून निघाले आणि मोठी खळबळसुध्दा उडाली. कर्वे पतीपत्नीला खूप त्रास सोसावा लागला.

पुनर्विवाहानंतर आनंदीबाईंनी कर्वे यांचा संसार उत्तम प्रकारे सांभाळला. त्यांना तीन मुलगे- शंकर, भास्कर व दिनकर, तर रघुनाथ हा कर्वेंचा पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा. या चारही मुलांचे त्यांनी उत्तम संगोपन केले. त्यांना शिक्षण दिले व त्यांच्यावर चांगले संस्कार केले. हे करीत असताना अण्णा कर्वेंच्या समाजकार्यात मदतही केली. अण्णांच्या हिमालयापुढे तो त्यांचा खारीचा वाटा असला तरी त्यांचे मोल कमी होत नाही. कारण आनंदीबाईंनी घर उत्तम सांभाळले. त्यामुळे समाजकार्य करायला अण्णा मोकळे राहिले. पंडिता रमाबाईंच्या कार्याचा प्रभावही त्यांच्यावर होता. लग्नानंतर अण्णांनी  अनाथ मुलींच्या शिक्षणासाठी आश्रम काढला. त्याचा परिणाम होऊन समाजाने दूर लोटलेल्या निराधार मुलींना त्या आपल्या घरी आश्रय  देऊ लागल्या. कर्वेंच्या घरी अनेक मुले राहत होती. आनंदीबाईंनीही अत्यंत गरीब, ज्यांना कुणी नाही अशा अनेक मुलामुलींना ठेवून घेतले. त्या मुलांनी कामे केली, आपल्या बुद्धीप्रमाणे शिकली आणि आपल्या पायावर उभी राहिली. अशा अनेक अनाथ मुलींच्या कहाण्या यात आल्या आहेत. त्यात एका मुलीला आलेले गर्भारपण कसे निस्तरले ते सांगितले आहे.

आत्मकथेमध्ये अनेक स्त्रियांची आयुष्यात घडलेले प्रसंग न सांगण्याची वृत्ती असते. आनंदीबाई असे काही करताना दिसत नाहीत. आपल्यावर गुदरलेल्या अतिप्रसंगावरून एक मोलाची गोष्ट त्यांनी  स्त्रियांना सांगितली आहे. तिच्या सासूबाईंनी दिलेला उपदेश म्हणजे आपण जोरदार असलो, तर पुरुष काही वाईट करू शकत नाहीत. सासूबाईंचा हा कानमंत्र त्यांनी तंतोतंत पाळला.

अण्णा कर्वेंवरील एका प्रकरणात त्यांचे अबोल, अतूट, हिशेबी बोलणे, भिडस्त स्वभाव, साधेपणा याविषयी लिहून त्यांचे व्यक्तिमत्त्व मोजक्या शब्दांत उभे केले आहे. काही मजेशीर गोष्टीसुध्दा सांगितल्या आहेत.

हे आत्मकथन पारदर्शी सहज शैलीतील म्हणून त्याचे वाङ्मयीन मोल मोठे आहे. आपल्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला लावणारे हे आत्मकथन आवर्जून वाचावे एवढे मोलाचे नक्की आहे.

[email protected]

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत)