वांबोरीतील दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

12 दिवसांपूर्वी वांबोरी परिसरातील ज्या विहिरीमध्ये पत्नीचा मृतदेह तरंगताना सापडला होता. त्याच विहिरीमध्ये शुक्रवारी दुपारी पतीचाही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याच विहिरीत पतीचा मृतदेह आढळून आल्याने या तरुण दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे मोठे कसब पोलीस प्रशासनावर आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे ही घटना घडली आहे. दोघांच्या मृत्यूमुळे दोन मुलांच्या डोक्यावरील छत्र, तर वृद्ध आई-वडिलांचा आधार हरपल्याने वांबोरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संतोष बाळासाहेब गोपाळे (वय 39, रा. वांबोरी, ता. राहुरी) असे मृताचे नाव आहे.

वैशाली बाळासाहेब गोपाळे ही 30 जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरातून ‘मामाकडे जाते,’ असे सांगून निघून गेली. दोन दिवस शोध घेऊनही ती सापडली नाही. शेवटी 1 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी वांबोरी येथील एका मंदिराशेजारील विहिरीत वैशालीचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, दोन दिवसापूर्वीच पती संतोष हा वैशालीचा दशक्रियाविधी उरकून नेवासा तालुक्यातील गोमळवाडी या मूळ गावातून वांबोरी-सुभाषनगर येथील आपल्या राहत्या घरी आला होता. परंतु शुक्रवारी सकाळी 11च्या सुमारास ज्या विहिरीत पत्नी वैशालीचा मृतदेह आढळला, त्याच विहिरीत पतीचाही मृतदेह आढळून आला.

मागील सात-आठ वर्षांपासून वांबोरी परिसरामध्ये रोजगाराच्या शोधात आलेल्या गोपाळे कुटुंबातील संतोष हा ड्रायव्हर म्हणून, तर पत्नी वैशाली शेतीवर रोजंदारीवर मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. याचदरम्यान संतोष गोपाळे याने फायनान्सचे कर्ज घेऊन मालवाहतूक टेम्पो घेतला. टेम्पोच्या व्यवसायातून कर्जाचे हप्तेही फिटत नव्हते. उलट आणखी कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. त्यामुळे पुन्हा फायनान्स गटाकडून कर्ज उचलून टेम्पोचे कर्ज भरण्याचा प्रयत्न या दाम्पत्याने केला; परंतु कर्ज अधिकच वाढत चालले होते. याच कारणाने पत्नीने 12 दिवसांपूर्वी व नंतर शुक्रवारी पतीने आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांत सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अजून कोणीही पुढे न आल्यामुळे सध्यातरी याविषयी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. कोणी पुढे येऊन फिर्याद दिली तर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.