
एन. बिरेन सिंह दुसऱ्यांदा मणीपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी सोमवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर आता मणीपूरमध्ये एन. बिरेन सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला आहे.
मणीपूरची राजधानी इम्फाळमध्ये राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल एल. गणेशन यांनी बिरन सिंह यांनी मुख्यमंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि मणीपूरचे प्रदेश अध्यक्ष मायुम शारदा देवी उपस्थित होते. बिरेन सिंह यांची दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित आमदारांच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. या बौठकीला केंद्रीय पर्यवेक्षक निर्मला सीतारमण आणि सह प्रयवेक्षक किरेन रिजिजू उपस्थित होते.
मणीपूरमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. भाजपला 60 पैकी 32 जागांवर विजय मिळाला आहे. 2017 मध्येही भाजपने सत्ता मिळवत बिरेन सिंह यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले होते. त्यावेळी भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसने 28 जागा जिंकल्या होत्या. मात्र, बहुमताचा आकडा त्यांना गाठता आला नाही. भाजपने एनपीपी आणि एनपीएफसोबत युती करून सत्ता मिळवली होती. या निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढत बहुमत मिळवले आहे.


























































