नगरमध्ये 49 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह

551

कोरोना संशयिताचे नमुन्यांचे अहवाल नगर प्रशासनाला मिळाले असून 49 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तसेच सर्व जणांचे अहवाल मिळाल्याची माहिती नगर जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रवीण मुरंबीकर यांनी दिली. नगरमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या आठवडाभरापासून कोरोना रोखण्यासाठी सर्वत्र सतर्कता पाळण्यात येत आहे. नगरमधून जे परदेशातून आले होते किंवा त्यांच्या संपर्कात जी व्यक्ती आली होती त्यांना तात्काळ तपासणीसाठी येथील रुग्णालयामध्ये बोलवण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क राहून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले होते. परदेशातून आलेल्या व्यक्तींचे तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या सुमारे 160 व्यक्तींचे वैद्यकीय चाचणीसाठी नमुने घेण्यात आले होते. हे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. शनिवारी रात्री प्रशासनाला 44 तर ,आज सकाळी पाच असे एकूण 49 नमुने प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जेवढे जेवढे नमुने जिल्हा प्रशासनाने पुणे प्रयोगशाळेत पाठवले होते ते सर्व प्राप्त झाले असून सर्व निगेटिव आहेत.

कोरोनाबाधित दोन जणांवर उपचार सुरू आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्यांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले. शासनाच्या निर्देशानुसार बाहेरून आलेल्या प्रवाशांची माहिती घेऊन तपासणीसाठी त्यांचे नमुने घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार प्रशासनाने माहिती घेण्यास सुरुवात केली असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मुरंबीकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या