‘सप्तपदी’ने तब्बल 300 शेत पाणंद रस्ते केले खुले, नगर जिल्हा महसूल विभागाचा पथदर्शी प्रकल्प

 

जिह्यात ‘महसूल विजय सप्तपदी अभियान’ हाती घेण्यात आले आहे. मागील जवळपास तीस दिवसांच्या अवधीत ‘सप्तपदी’द्वारे जिल्हाभरातील तब्बल 300 शेत पाणंद रस्ते महसूल अधिकाऱ्यांच्या पुढाकारात सामोपचाराने मोकळे झाले. तसेच, 1 हजार 233 तुकडे नियमितीकरणाच्या प्रकरणी कारवाई करीत तब्बल चार कोटींचा महसूल जमा झाला आहे.

मुखत्वे शेतजमिनीविषयक समस्या सोडविण्यासाठी जिह्यात ‘महसूल विजय सप्तपदी’ अभियान हाती घेण्यात आले आहे. 4 फेब्रुवारी रोजी या अभियानाची घोषणा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केली. ‘महसूल विजय सप्तपदी’ अभियानात जमीनविषयक कामे जलदगतीने करतानाच नागरिकांसाठी दिलासादायक ठरतील अशा बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत प्रत्येक तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे समन्वय अर्थात नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे.

रस्त्यातील अतिक्रमणांवर कारवाई करणे, प्रत्येक गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे, पोट खराबा असलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करून या जमिनी लागवडीखाली येण्यासाठी प्रयत्न करणे, महाआवास योजनेतून घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे, पाणंद आणि शेत रस्ते खुले करणे, खंडकऱयांना जमिनी मिळवून देणे, आदी कामे मुख्यत्वे या योजनेतून करण्यात येत आहेत.

7 फेब्रुवारीपासून जिल्हाभरात सप्तपदीची अंमलबजावणी सुरू झाली. प्रत्येक महसूल मंडळात तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या प्रबोधनातून सप्तपदीचा जागर सुरू झाला. अनेक शेत व पाणंद रस्ते वर्षानुवर्षे विवादाच्या फेऱयांत अडकून पडले आहेत. वादाच्या अडथळ्यामुळे वावरायला मर्यादा पडणे साहजिकच आहे. सप्तपदीने मागील तीस दिवसांच्या काळात शेत पाणंद रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याची कामगिरी झाली. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व महसूल कर्मचारी वर्गाने सुसंवाद स्थापित करीत बजावलेली भूमिका दखलपात्र ठरली.

तुकडे नियमितीकरणातून चार कोटींचा महसूल जमा

जिह्यातील 300 शेतपाणंद रस्ते खुले झाले तसेच 1 हजार 233 तुकडे नियमितीकरणाच्या प्रकरणी कारवाई करीत तब्बल 4 कोटींचा महसूल जमा झाला आहे. ‘सप्तपदी’अंतर्गत जिह्यातील सहा गावांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित ‘सप्तपदी’चा समन्वय राखत आहेत. अभियान पुढील काळातही सुरू राहणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या