नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच, गारपीट, वादळामुळे शेतकरी हतबल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. शनिवारीही जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱयासह पावसाने हजेरी लावली असून, नगरसह अनेक तालुक्यांमध्ये गारपीट झाली आहे. या पावसामुळे कांद्यासह इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून, ठिकठिकाणी वीजपुरवठय़ात अडथळे येत आहेत.

नगर शहर आणि परिसरात शुक्रवारी रात्री वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यांमुळे वीज यंत्रणेचे नुकसान होऊन शहरातील काही भागांचा वीजपुरवठा रात्रभर खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर अवकाळी पावसाने गुरुवारी रात्री नगर शहर आणि परिसरात जोरदार हजेरी लावली होती. शनिवारीही शहरासह उपनगरामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस आल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळी वाऱयांमुळे काही ठिकाणी झाडे पडली. सावेडी मंडलात तब्बल 40 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे सखल भागातील गल्लीबोळात पाणी साचले. लाइनवर झाडे पडल्याने कंडक्टर तुटले. त्यामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा रात्री खंडित झाला होता.

अकोले तालुक्यातील आढळा खोऱयातील टाहाकारी, समशेरपूर, केळी रुम्हणवाडी, नागाचीवाडी, घोडसरवाडी या परिसराला गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपूनच काढले. शेतातील उभी पिके या गारांनी प्रभावित होऊन भुईसपाट झाली. कांदा, ऊस, टोमॅटो, झेंडू, कोबी, फ्लॉवर, ब्रोकली व भाजीपाला या गारांनी झोडपून काढला.

‘त्या’ पावसाने 162 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने नगर तालुक्यातील 12 गावांतील 162.60 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. 274 शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे. कर्जत तालुक्यातील तीन गावांत 96 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. 140 शेतकऱ्यांना फटका बसला. जामखेड तालुक्यातील तीन गावांतील 25 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले असून, 65 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अकोले तालुक्यातील तीन गावांत 3.57 हेक्टर शेतपिके वाया गेली असून, 65 शेतकऱयांना फटका बसला आहे.