गणपती मंडप पाडणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा!

nagar-ganesh-pandal-issue

सामना प्रतिनिधी । नगर

प्रशासनातील अधिकारी हे हिंदुविरोधी विरोधी आहेत. जोपर्यंत गणपती मंडप पाडणाऱ्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होणार नाही व नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी दिला आहे. महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे प्रशासनाचा निषेध करून मंडळे कोणत्याही प्रकारची परवानगी घेणार नाहीत व रस्त्यावर गणपती बसवले जातील. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले.

सोमवारी गोकुळाष्टमीच्या दिवशी मंडपावर केलेल्या कारवाईच्या संदर्भात पत्रकारांशी बोलताना अनिल राठोड यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, प्रशासनाने केलेली कारवाई अत्यंत चुकीचे आहे. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी नायर यांनी तसेच इथापे यांनी कारवाई करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. असे अधिकारी असतील तर या नगरचे काय होईल असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. नायर यांनी कारवाई करून ते एक महिन्याच्या सुट्टीवर निघून गेले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

आज आमच्यावर एवढे निर्बंध लादले जातात, पण इतर समाजाच्या ज्या मिरवणुका निघतात त्या तुम्ही कमी करता का?, असा सवालही राठोड यांनी उपस्थित केला. हे प्रशासन हिंदुविरोधी व शिवसेना विरोध असून एकतर्फी कारवाई करत असेल तर गणेशोत्सव साजरा करायचा कसा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मंडपावर कोणाच्या सांगण्यावरून कारवाई केली हे प्रशासनाने जाहीर केले पाहिजे. ही कारवाई करताना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सांगितले का याचाही खुलासा व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले. जोपर्यंत या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत शिवसेना कदापि हटणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.