महिनाभरानंतरही नगरमधील आगीचे कारण अस्पष्टच, अहवाल गुलदस्त्यात; पोलीस तपासही थंडावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagar-hospital-fire

जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीला एक महिना उलटून गेला. राज्य शासनाला अहवाल दिला तरीही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्यापि गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सुरू केलेला तपास का थंडावला आहे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

नगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागाला नोव्हेंबर महिन्यात लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. या घटनेला काल एक महिना पूर्ण झाला. या आगीची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या नेतृत्वाखाली सातजणांची समिती गठित केली होती. या समितीने अनेकांचे जबाब घेतले. तसेच अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली होती. याचा एकत्रित अहवाल त्यांनी गेल्या आठवडय़ात राज्य शासनाला सादर केला आहे.

आगीच्या घटनेला महिना उलटून गेला तरी नेमकी आग कशामुळे लागली? याला जबाबदार कोण? यांसह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन डॉक्टर व दोन कर्मचारी अशा चौघांना अटक केली होती. त्या चौघांचे जामीन मंजूर करण्यात आले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे दिला आहे.

वास्तविक एक महिना उलटून गेला तरीही पोलिसांना तपासामध्ये म्हणावे असे यश आलेले नाही. राज्य शासनाच्या कमिटीने अहवाल सादर केला. मात्र, पोलिसांना कागदपत्रे का मिळू शकत नाहीत? किंवा ती कागदपत्रे हस्तगत का केली गेली नाहीत? यासह विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी आम्हाला महावितरण, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापि अहवाल मिळालेले नाहीत, असे सांगितले आहे. पोलीस विभागाने महावितरणसह सार्वजनिक बांधकाम विभागाला चार वेळा पत्र देऊनही कागदपत्रे का मिळत नाहीत? हा खरा प्रश्न आहे.