
पथदिवे, घनकचरा घोटाळ्यांनंतर नगर महापालिकेत आता आणखी एक घोटाळा उघड झाला आहे. घर बांधून झाल्यानंतर मिळणारे बांधकाम पूर्णत्वाचे (कम्प्लिशन सर्टिफिकेट) बोगस दाखले वाटल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेकडून दररोज अनेक कम्प्लिशन सर्टिफिकेट्स दिली जातात. त्यामुळे हा घोटाळाही लाखोंच्या घरात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चक्क ऑनलाइन प्रणालीतही हा प्रकार केला जात असल्याचे समोर आले आहे.
घर बांधण्यासाठी नागरिकांना संबंधित महापालिकेकडून बांधकामांची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी संबंधित व्यक्तीला महापालिकेने नेमून दिलेल्या अभियंत्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी लागते. त्यानंतर लाखो रुपये खर्च करून बांधकाम पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाकडून पूर्णत्वाचा दाखला म्हणजेच कम्प्लिशन सर्टिफिकेट घ्यावे लागते. पूर्वी संबंधित अभियंता यासाठीची फाईल तयार करून नगररचना विभागाला सादर करीत होते. त्यानंतर त्याच अभियंत्यामार्फत नागरिकांना कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत होते. मात्र, सध्या हे दाखल ऑनलाइन पद्धतीने वितरित केले जातात. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर ऑफलाइन पद्धतीनेही फाईल संबंधित अधिकाऱयाकडे सुपूर्द करावी लागते. त्यानंतर संबंधित नागरिकाने आराखडय़ानुसार बांधकाम केले आहे की नाही, हे बघून एका महिन्याच्या आत कम्प्लिशन सर्टिफिकेट दिले जाते. सध्या ऑनलाइन पद्धतीने हे दाखले देण्यात येतात. त्यावर नगररचना विभागाच्या प्रमुख असलेल्या नगररचनाकाराची डिजिटल स्वाक्षरी असते. शिवाय बारकोडही दिलेला असतो.
दरम्यान, नगर मनपामध्ये ऑनलाइन पद्धतीचा वापर करताना अनेक प्रकार उजेडात आले आहेत. ऑनलाइनचा वापर करण्याचा आदेश असतानाही पूर्वीच्या पद्धतीनुसार ऑफलाइन पद्धतीनेही फाईल सादर करावी लागत आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर मूळ दाखला न देता बनावट दाखले देण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. असे दाखले मिळालेल्या नागरिकांनी संबंधित विभागातील अधिकाऱयांना याची माहिती दिल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले असून, काहीजण थेट रजेवर गेले आहेत, तर काहीजणांनी अशा दाखल्यांमध्ये परस्पर दुरुस्ती करून दिली आहे. त्यामुळे शहरात आजवर किती बोगस दाखले दिले, त्यातून किती रुपयांचा घोटाळा झाला, यामागे एखादे रॅकेट आहे का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
एकाच विभागात 20 वर्षे काम केलेल्यांच्या अचानक बदल्या
महापालिकेत गेल्या 20 वर्षांपासून अनेकजण नगररचना विभागातच काम करीत होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांमध्ये अनेकांनी आपल्या बदल्या करून घेतल्या आहेत. इतके दिवस या कर्मचाऱयांनी या ठिकाणाहून बदली होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला. मग दोन महिन्यांमध्ये या विभागातील 70 टक्के कर्मचाऱयांच्या बदल्या कशा झाल्या, यामागे काय कारणे आहेत, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.
कम्प्लिशन सर्टिफिकेट देताना महापालिकेने ऑनलाइन पद्धतीचा वापर सुरू केला आहे. मात्र, यात काही तांत्रिक चुका आढळून आल्या असून, त्याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. काही बोगस दाखले दिले गेले, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, आता दाखल्यांमध्ये सुधारणा करता येते.
– राम चारठाणकर,
नगररचनाकार, नगर महापालिका.































































