नगर शहर सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहर सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली होती; परंतु राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्याच टप्प्यावर थांबवत 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बँकेची निवडणूक लांबणीवर पडली होती. दरम्यानच्या काळात बँकेचे निवडणुकीतील उमेदवार सुनील फळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे सदरचा निवडणूक कार्यक्रम रद्द करत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेश पुरी यांनी सोमवारी (दि. 26) बँकेचा निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर केला आहे.

नगर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 26) नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 जानेवारी रोजी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, वैध अर्जांची यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 3 जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांना 18 जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे, तर 29 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून, 30 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

बँकेच्या सर्वसाधारण 10, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी 1, महिला प्रतिनिधी 2, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी 1, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी 1, अशा एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

दरम्यान, यापूर्वीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांना पुन्हा नव्याने अर्ज दाखल करता येणार नाहीत. त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यांना पुन्हा निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार नाहीत. तसेच यापूर्वीचे चिन्हवाटप पूर्णतः रद्द करण्यात आले असून, उमेदवारांना नव्याने चिन्ह वाटप केले जाणार आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांनी दिली आहे.