नगर शहरामध्ये दुपारपासून दुकाने बंद करण्याची प्रक्रिया सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लागण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानंतर नगर जिल्ह्यामध्ये अनेक दुकाने बंद केली जात आहेत. पोलीस प्रशासनाने नागरिकांना विनंती करून गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या असे आवाहन सुद्धा केले आहे. दरम्यान नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले.

तहसीलदारांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सुविधा सोडून बाकी सर्व दुकाने, हॉल, मंगल कार्यालय इत्यादी तात्काळ बंद करण्यात यावेत. तसेच कोणत्याही ठिकाणी जसे की रस्ते, चहापानाची ठिकाणे, टपरी इत्यादी ठिकाणी गर्दी करू नये. अन्यथा प्रतिबंधात्मक आदेश उल्लंघन केल्या बाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल. सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करून शक्यतो कमीतकमी घराबाहेर पडावे आणि प्रशासनास सहकार्य करावे. आज नगर शहरातील सावेडी तसेच शहरातील कापडबाजार, नवी पेठ माळीवाडा तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या दुकानांना पोलीस प्रशासनाने विनंती करून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. जेणेकरून दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. दुकाने बंद झाली असली तरी दुसरीकडे मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.