अपेक्षेप्रमाणे ‘नगर अर्बन’वर सहकार मंडळाचे वर्चस्व, विरोधकच नसल्याने एकतर्फी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थापनेची 111 वर्षे पूर्ण केलेल्या नगर अर्बन मल्टिस्टेट शेडय़ुल्ड बँकेवर अपेक्षेप्रमाणे सहकार मंडळाने वर्चस्व मिळवले. निवडणूक रिंगणात सक्षम विरोधक नसल्याने 14 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार मंडळाने सर्व जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. निवडणूक निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात मंडळाच्या समर्थकांसह निवडून आलेल्या नव्या संचालकांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.

चुकीचे कर्जवाटप, वाढलेला एनपीए, लपवलेली आकडेवारी आदी कारणांनी मागील 2014 ते 2019चे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने बरखास्त करून बँकेवर प्रशासक नेमला होता. सुमारे सव्वादोन वर्षे बँकेवर प्रशासकराज होते. बँकेच्या थकबाकीची पुरेशी वसुली होत नसल्याने अखेरचा प्रयत्न म्हणून रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेची धुरा लोकनियुक्त संचालक मंडळाच्या हातात देण्यासाठी राज्य सहकार प्राधिकरणाच्या माध्यमातून निवडणूक जाहीर केली होती. बँक बचाव कृती समितीचे पॅनेल व गांधी समर्थकांचे सहकार पॅनेल यांच्यात लढत अपेक्षित होती. सुरुवातीला या दोन्ही पॅनेलमध्ये समेट घडून निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा होती. मात्र, सहकार मंडळाने बँक बचाव कृती समितीला चर्चेच्या गुऱहाळात गुंतवून ठेवत शेवटी बिनविरोध न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे बँक बचाव कृती समितीने निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सहकार मंडळाला निवडणूक अधिक सोपी झाली. त्यांचे चार उमेदवार आधीच बिनविरोध झाले होते. राहिलेल्या 14 जागांसाठी रिंगणात 21 उमेदवार होते.

नगर अर्बन बँकेच्या 18 जागांपैकी चार जागांवर संगीता गांधी, मनेष साठे, मनीषा कोठारी, दिनेश कटारिया हे बिनविरोध निवडून आले आहेत. 14 जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या उपस्थितीत कल्याण रस्त्यावरील अमरज्योत मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. 14 जागांसाठी 21 उमेदवार रिंगणात होते. यात सत्ताधारी सहकार पॅनेलचे 14 आणि अपक्ष 7 उमेदवार होते. मनपा-भिंगार कॅण्टोन्मेंट मतदारसंघाच्या 10 जागांसाठी 14 तर उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र मतदारसंघाच्या 4 जागांसाठी 7 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या दोन्ही मतदारसंघाच्या प्रत्येकी 3 फेऱयांनुसार मतमोजणी झाली. प्रारंभी मनपा-भिंगार कॅण्टोन्मेंट कार्यक्षेत्र मतदारसंघातून अजय बोरा, अनिल कोठारी, ईश्वर बोरा, गिरीश लाहोटी, दीप्ती गांधी, महेंद्र गंधे, राजेंद्रकुमार अग्रवाल, राहुल जामगावकर, शैलेश मुनोत, संपतलाल बोरा हे दहा उमेदवार विजयी झाले. तर, गट्टाणी, डापसे, पोखरणा व गुंदेचा यांचा पराभव झाला. उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र मतदारसंघातून कमलेश गांधी, अतुल कासट, अशोक कटारिया व सचिन देसरडा हे चौघे विजयी झाले.

अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड आजच

n नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. उद्या (दि. 1) सकाळी 11 वाजता मतमोजणीच्या ठिकाणी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून, यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक निकाल अधिकृतपणे जाहीर करणार आहेत. त्यानंतर दुपारी दीड वाजता बँकेच्या सभागृहात बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जाणार आहेत. अध्यक्षपदासाठी शैलेश मुनोत व अनिल कोठारी यांची, तर उपाध्यक्षपदासाठी मनेष साठे यांचे नाव चर्चेत आहे.