
उत्तर हिंदुस्थानात लग्नात नागीन डान्स करणं ही तशी नेहमीची बाब. पण, या नागीन डान्समुळे एका माणसाचं लग्न मोडल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. त्यावरून लग्नमंडपात चांगलाच गोंधळ माजला आणि तो थांबवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इथल्या लखीमपूरमध्ये शुक्रवारी एक लग्नसोहळा सुरू होता. सगळे विधी निर्विघ्नपणे पार पडत होते. योग्य वेळी वरमालेचा विधी संपन्न करण्यात आला आणि विवाह संपन्न झाल्याचं जाहीर करण्यात आलं. लग्नानंतर निघालेल्या वरातीवेळी सर्वजण नाचगाण्यात दंग झाले. नवरा मुलगाही दारु प्यायला आणि नाचू लागला. दारुच्या नशेत त्याने नागीन डान्स करायला सुरुवात केली. आपल्या नवऱ्याला अशाप्रकारे नाचताना पाहून नवऱ्या मुलीचा पारा चढला. तिने तिथेच हे लग्न मोडल्याचं जाहीर केलं.
नवऱ्या मुलीचा निर्णय ऐकताच तिथे एकच गहजब उडाला. आधी तिला समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ती या मनवण्याला न बधता आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिचा निर्णय ऐकून नवऱ्या मुलाचा पारा चढला. तो तिच्या आई-वडिलांशी भांडला. इतक्यावरच न थांबता त्याने नवऱ्या मुलीच्या श्रीमुखात भडकवली. वाद वाढतोय, असं पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आलं. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवलं.


























































