
रेल्वेने प्रवाशांना लक्झरीयस सुविधा मिळण्यासाठी रेल्वेस्थानकांचा विकास करण्याचा सपाटा लावला आहे. नागपूर रेल्वेस्थानकापासून 2.8 कि.मी.अंतरावर असलेल्या दिल्ली -चेन्नई मार्गावरच्या अजनी रेल्वे स्थानकाचे रुपडं पालटणार असून ते आता अत्यंत हायफाय होणार आहे.
अजनी रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास करण्यासाठी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने 301 कोटींची निविदा काढली आहे.या बाबत 17 ऑगस्ट रोजी निविदापुर्व बैठक झाली होती. आता 27 सप्टेंबरपर्यंत निविदा भरायची आहे. 40 महिन्यात बांधकाम पुर्ण करायची अट ठेवण्यात आली आहे.
अजनी रेल्वेस्थानकात स्थानिक वैशिष्ट्ये आणि आधुनिकता असा संगम असणार आहे. हे स्थानक ग्रीन एनर्जीवर चालेल. रेन हार्वेस्टिंग तसेच सौरऊर्जा आदी ग्रीन एनर्जी त्याकरीता वापरण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकात प्रवाशांना अगदी सहज प्रवेश मिळावा यासाठी स्कायवॉक तसेच प्रशस्त प्रवेश कक्षाची उभारणी करण्यात येईल.
50 हजार प्रवाशांना सामावणारे भव्य स्थानक
या स्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ मेट्रोचे स्थानक उभारण्यात येणार आहे आणि बसचे टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या स्थानकांवर सध्या दररोज 6,075 प्रवासी ये जा करतात, 2060 येथे 50 हजार प्रवाशांना सामावून घेता येईल इतक्या भव्य स्वरूपात या स्थानकांवर सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत .
मेट्रो आणि बस सेवेशी हे स्थानक जोडले जाईल आणि प्रवाशांना आंतराष्ट्रीय दर्जाचा अनुभव दिला जाईल असे भूमी विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष वेदप्रकाश डुडेजा यांनी सांगितले.
50,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक…
देशभरातील एकूण 125 स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाकडून 63 स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरु आहे, तर रेल्वे भूमी संपादन प्राधिकरणाकडून 60 रेल्वे स्थानकांचे काम सुरु आहे. आणि दोन स्थानकांवर विभागीय रेल्वेकडून कार्य सुरु आहे. 123 स्थानकांच्या पुनर्विकासासाठी एकूण 50,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.
रेल्वे स्थानकाची ठळक वैशिष्ट्ये :
प्रशस्त प्रवेश कक्ष
आकर्षक बाह्य दर्शनी भाग
थीम आधारित प्रकाशयोजना
थेट प्रक्षेपण आणि प्रदर्शन एलईडी वॉल
विशेष समर्पित कलादालन
मध्यवर्ती वातानुकूलित बहुउद्देशीय प्रतीक्षा कक्ष
सरकते जिने आणि लिफ्टची सोय
दिव्यांगजनांसाठी सोयीसुविधा


























































