
सध्या कोरोनाच्या काळात अनेकांना एकवेळचे जेवण मिळणेही अवघड झाले आहे. अशात नागपुरात मात्र तुम्हाला आगळेच चित्र दिसेल. इथे रस्त्यावरील भटकी कुत्री रोज चक्क चिकन बिर्याणी खाताना दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. नागपुरातील ज्योतिषी रणजित नाथ दररोज जवळपास 190 भटक्या श्वानांना स्वादिष्ट बिर्याणी स्वतःच्या हाताने शिजवून खाऊ घालताहेत. त्यांच्या या प्राणीप्रेमाचे मोठे कौतुक नागपूरच्या नागरिकांना आहे.
मागील महिन्यापर्यंत रणजित हेच भटक्या श्वानांच्या बिर्याणीसाठीचा बहुतेक खर्च करत असत. एका फूड ब्लॉगरने रणजित यांचा व्हिडीओ शूट करून पोस्ट केला होता. यानंतर रणजित यांना देणग्या मिळू लागल्या आहेत. ज्यांच्याकडे पुरेसा वेळ नसल्यामुळे ते भटक्या जनावरांना खायला देऊ शकत नाहीत ते रणजित यांना आर्थिक मदत करीत आहेत, अशी माहिती त्यांना या कामात मदत करणाऱया राहुल मोटवानी यांनी दिली.



























































