
आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱया ऑस्कर पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली. लॉस एंजेलिसमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. ‘आरआरआर’ चित्रपटातील नाटू नाटू गाण्यासह ‘द एलिफंट व्हिस्पर’ या माहितीपटाने ऑस्करवर मोहोर उमटवली. त्यानंतर आता दिग्दर्शक नागराज मंजुळेने यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित ऑस्करशी आपली ‘नाळ’ कशी जुळलीय, याची माहिती दिली.
नागराजने लिहिलंय की, ‘द एलिफंट व्हिस्पर’ हा माहितीपट माझी मैत्रिण संचारी हिने एडिट केला आहे. ‘नाळ’ हा चित्रपट संचारीने एडिट केला आहे. सुधारक आणि संचारी यांना प्रेम आणि सदिच्छा. विशेष म्हणजे नाटू नाटू गाण्याचा गीतकार चंद्रबोस यांनीच ‘घर बंदूक बिर्याणी’ मधल्या ‘गुन गुन’ गाण्याचे तेलगू बोल लिहिले आहेत. अशातऱहेने नागराजने ऑस्कर कनेक्शन कसे आहे, ते सांगितले आहे. नागराजच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईकचा वर्षाव केला आहे.



























































