नायगाव बीडीडी 864 घरांचा लवकरच ताबा, 500 चौरस फुटांचे प्रशस्त घर मिळणार

वरळीपाठोपाठ आता नायगाव बीडीडीवासीयांचे अलिशान घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार झाल्या असून ८६४ कुटुंबांना लवकरच घराचा ताबा दिला जाणार आहे. त्यासाठी म्हाडाने मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळताच चावी वाटपाचा सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे वर्षानुवर्षे १६० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना ५०० चौरस फुटाचे प्रशस्त घर मिळणार आहे.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाले आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे बांधकाम कंत्राटदार एल अॅण्ड टी कंपनीमार्फत सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत क्र. ८ मधील टॉवर क्र. ४ ते ८ या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले असून इमारतींना ओसी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, रहिवाशांना लवकरात लवकर घराचा ताबा मिळावा यासाठी म्हाडाने तयारी सुरू केली आहे.

– नायगाव बीडीडी येथील ४२ चाळींचा पुनर्विकास करून ३३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारतीमध्ये करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे बांधकाम दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ८ तर दुसऱ्या टप्प्यात १२ पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत.