“भाजप एकनाथ शिंदेंचं काय करेल हे सांगता येत नाही”, जागावाटपाच्या वक्तव्यावरून नाना पटोलेंचा टोला

येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप 240 जागा लढेल असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. तर मिंधे गट भाजपवर नाराज झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे.

“एकनाथ शिंदें यांनी भाजपपासून सतर्क राहावे”, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला आहे. ते म्हणाले की, “आता कुठे सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांचं चागलं व्हावं, अशी आमची सदिच्छा आहे. पण भाजप त्यांचं काय करेल हे आता सांगता येणार नाही. जे बावनकुळेंच्या पोटात होतं, तेच त्यांच्या ओठातून निघालं आहे”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, “दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दलची खोटी बातमी पसरवण्यात आली. खरंतर आमच्यात अशी कोणतीच चर्चा झाली नव्हती. पण चुकीची बातमी पसरवून वातावरण निर्मिती करण्यात आली. मात्र, याप्रकरणात तर आता स्वत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष बोलले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आज त्यांनी यावरून घुमजावदेखील केला. त्यामुळे जे बावनकुळेंच्या पोटात आहे, तेच त्यांच्या ओठावर आलं आहे, हे एकनाथ शिंदे यांनी समजून घ्यावं, त्यांनी आता सर्तक राहायला हवं”, असा सल्ला पटोले यांनी दिला.

“भाजप हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. भाजपकडून सतत लोकांची दिशाभूल करण्यात येते. भाजपबद्दल आता लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे”, अशी घणाघाती टीका पटोले यांनी केली.