आरक्षणाच्या मुद्यावर जाती, समाजात विष कालवण्याचे काम सुरू; नाना पटोले यांचा मिंधे सरकारवर घणाघात

nana-patole

राज्यातील भाजप, शिंदे गट व अजित पवार गट या ट्रिपल इंजिनच्या सरकारने आरक्षणाच्या मुद्यावर जाती-जातीत, समाजा-समाजात विष कालवण्याचे व भांडणे लावण्याचे काम सुरू केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. चिमूर येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचे हात मजबूत करा, तरच लोकशाही टिकून राहील, असेही पटोले म्हणाले.

देशातील लोकशाही, संविधान, धोक्यात आहे. पंतप्रधान व्यापार करीत असल्याने मुठभर श्रीमंत व्यापारी यांना लाभ मिळण्यासाठी सामान्य शेतकरी, नागरिक यांची आर्थिक लूट करत आहेत. देशात सध्या हुकूमशाहीचे राज्य सुरू आहे. लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचे हात मजबूत करण्याची वेळ आहे. येणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेसला विजयी करा, अन्यथा देशात हुकूमशाही लागू झाल्याशिवाय राहणार नाही, असे विचार व्यक्त केले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टिवार उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना म्हणाले की, चिमूर विधानसभा क्षेत्रातूनच नव्हे तर चंद्रपूर-गडचिरोली जिल्हयातूनसुद्धा कांग्रेस उमेदवारांना विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी केल्याशिवाय राहणार नाही. सरकार आरक्षणाच्या नावावर जाती-जातींमध्ये, समाजा- समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करित आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये सर्व हेवेदावे विसरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन स्थानिक आमदार व खासदार यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.